सदरबझारमध्ये रविवारी नगरवाचनालयाचा वाचन कट्टा उपक्रम सुमित्राराजे उद्यानात बीएआयच्या पदाधिकाऱ्यांसह आदर्श विद्यामंदिराचे विद्यार्थी होणार सहभागी
सातारा, दि. १३ (प्रतिनिधी)- येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) वाचनालयाच्यावतीने वाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी ‘वाचन कट्टा’ या सामूहिक वाचनाचा तिसरा उपक्रम सदरबझारमधील सुमित्राराजे उद्यानात रविवारी (दि. १५) सकाळी ९ ते १० या वेळेत होणार आहे.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भोसले (थोरले) नगर वाचनालयाच्यावतीने जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी शहरातील एका नियोजित ठिकाणी या कट्ट्याचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती नगर वाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी दिली. पहिला उपक्रम राजवाड्यातील प्रतापसिंह उद्यानात झाला. दुसरा उपक्रम गुरुवार बागेत झाला होता. या उपक्रमात एखादी विशिष्ट संस्था किवा गटाचे पदाधिकारी व सदस्य तसेच काही विद्यार्थी पुस्तकाचे वाचन करतात. उपक्रमात सहभागी होणारा प्रत्येक जण सोबत एक पुस्तक आणेल व ठरलेल्या वेळात त्या पुस्तकाचे वाचन करेल. नगरवाचनालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत वाचन करण्यासाठी येणाऱ्या नियोजित संस्थेचे सदस्य तसेच विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात.
रविवारी (दि. १५ मार्च) रोजी सदरबझारमधील सुमित्राराजे उद्यानात होणाऱ्या वाचन कट्ट्यात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत. तसेच सदरबझारमधील कूपर कॉलनीतील लोकराजा राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यामंदिराचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
नगरवाचनालय ही संस्था १७५ वे वर्ष साजरे करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून १७३ वर्षे वाचक नगरवाचनालयात येत आहे. आता त्याचबरोबर नगरवाचनालयही वाचकांपर्यंत जाईल असा हा उपक्रम राबविला जात असल्याचे श्री. अमित कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. वाचकांची संख्या वाढावी आणि सोशल मीडियाच्या जमान्यात वाचनाची सवय अधिक वाढावी, यासाठी या उपक्रमातून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच हा वाचन कट्टा सर्वांसाठी मुक्तही असणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सदरबझारमधील नागरिकांनी रविवारी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मोबाइल बंद ठेवावा लागणार
सामूहिक वाचनाच्या या उपक्रमाच्या वेळी वाचन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत म्हणून सर्वांनीच काही संकेत पाळणे अपेक्षित असल्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार मोबाइल पूर्णपणे बंद ठेवणे महत्त्वाचे आहे. या सामूहिक वाचनाच्या काळात मोबाइल सायलेंट मोडवर ठेवून उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच वाचनाला सुरवात झाल्यानंतर एकमेकांशी बोलणे किंवा इतरांचे लक्ष वेधण्यासाठी काही कृती करु नये अशा काही अपेक्षा पूर्ण झाल्या तर उपक्रमाचा हेतू चांगल्या पद्धतीने साध्य होईल, असे यांनी स्पष्ट केले.




