एसटी कर्मचारी सागर नलावडे यांची क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
महाबळेश्वर: एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत काम करून प्रवासी सेवा अविरतपणे पुरवत असतात. मात्र, कामासोबत आपल्यातील कलागुणांनाही वाव देण्याची गरज आहे. महाबळेश्वर आगारातील चालक कम वाहक सागर नलावडे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. नलावडे यांनी जळगाव येथे झालेल्या एसटी महामंडळाच्या क्रीडा स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकावले आहे.
महाबळेश्वर आगारात त्यांचा सत्कार आगार व्यवस्थापक महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आगार लेखाकार महेश शिंदे, वरिष्ठ लिपिक विकास कांबळे, अजित जमदाडे, शंकर सूर्यवंशी, जयवंत जाधव, संजय निकम, विठ्ठल चव्हाण, संतोष सावंत, सुदर्शन शिंदे, सूर्यकांत जाधव, अमोल डुबल आदी उपस्थित होते.
सागर नलावडे यांच्या सुवर्ण कामगिरीमुळे सातारा विभागाचे नाव उंचावले आहे. विभागीय नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक आधिकारी ज्योती गायकवाड, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी विजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
