श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये वारकरी दिंडीसाठी जमला बाल वैष्णवांचा मेळा
सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त बालचमुंच्या वारकरी दिंडीचे आयोजन संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना महाराष्ट्रातील आध्यात्मिक परंपरेची ओळख करून देणे या हेतूने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत गळ्यात टाळ, कपाळी टिळा , डोक्यावर टोपी तर विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा, डोक्यावर तुळस, तर कोणी हातात विठ्ठल रखुमाई ची मूर्ती घेऊन व मुखाने हरिनामाचा गजर करत मोठ्या उत्साहाने हे छोटे वारकरी दिंडीत सहभागी झाले होते.
करंजे येथील भैरवनाथ पटांगणावर छोट्या वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचा ही अनुभव घेतला .हलगीच्या तालावर भगव्या पताका नाचवत विद्यार्थ्यांनी रिंगण पूर्ण केले. टाळकरीही टाळाच्या गजरात भक्ती रसात न्हाऊन गेले. विद्यार्थिनींनी ही माऊलीच्या नामघोषात फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. विद्यालयातील श्रीमद गुजर व आयुष तुपे या विद्यार्थ्यांनी रिंगणामध्ये अभंग गायन केले व विठुरायाची भक्ती गीते ही गायली त्यामुळे सर्व वातावरण विठूमय होऊन गेले. उपस्थित ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. शिक्षक वृंदही भक्ती भावाने या पालखी सोहळ्यात सहभागी झाला होता. या पालखी सोहळ्याचे नियोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने केले होते. मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड व सर्व सहकारी शिक्षकांनी सहकार्य केले.
