श्रमसंस्कार शिबीरातून भारताची नवी पिढी उद्यमशील घडेल –इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे
लोणंद येथे प्रबोधनपर व्याख्यानमाला
लोणंद : राष्ट्रपुरुषांच्या बलिदानाच्या जोरावर भारताची भूमी पवित्र झाली आहे. स्मारकं त्यांची उभी राहतात ज्यांनी अखंड आयुष्य समाजाच्या उद्धारासाठी खर्ची घातलं. राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून तरुणांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे. श्रमसंस्कार शिबीर हे त्यासाठी उत्तम माध्यम आहे. श्रमसंस्कार शिबीरातून भारताची नवी पिढी उद्यमशील घडेल असा विश्वास इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केला.
लोणंद ता. येथील शरदचंद्र पवार महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ‘ श्रम संस्कार शिबीर ‘ कार्यक्रमातील प्रबोधनपर व्याख्यानमालेत ‘ ऐतिहासिक दृष्टीकोनातून समाजनिर्मिती ‘ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य सी. जे . खिलारे, डॉ. कृष्णा गालिंदे , उपप्राचार्य भिमराव काकडे , प्रा. एस. एस. कदम , प्रा. एस. व्ही. गायकवाड , प्रा. रविंद्र सोनवणे यांसह प्रमुख उपस्थित होते.
इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे म्हणाले, जिद्द , चिकाटी आणि नियोजनाच्या बळावर निश्चित यश मिळवता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ७५० वर्षाचे पारतंत्र्य केवळ ३५ वर्षाच्या कार्यकाळात हटवले ते केवळ नियोजन आणि पराक्रमाच्या जोरावर करून दाखविले. संकटातून मार्ग काढण्यासाठी योजना आखल्या त्यामुळे यश मिळाले. कोणत्याही कामाचे योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. शालेय वयात अभ्यासातील सातत्य ठेवून प्रत्येक विषयाच्या मूळाशी पोहचून आकलनपूर्वक अभ्यास केला तर अपयशाला सामोरे जावे लागणार नाही. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी योग्य नियोजन व कामाची वेळेत सुरुवात करायला हवी. जीवनात संकट ही कधीच अडवायला येत नाहीत तर ती आपणाला घडवायला येतात. संकट कितीही मोठे असूद्या मनातील भीती बाजूला सारून संकटांवर स्वार व्हायला शिका. पुढे जाण्यासाठी संकटांना संधी मानून काम केले तर तुम्ही यशाच्या शिखरावर निश्चित पोहचाल. आपल्यातील कमतरतांचे कारण पुढे करून अडून बसू नका त्यांना बलस्थाने बनवा तुमचा यशाचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
