महाबळेश्वरच्या समस्यांवर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; नगरपरिषदेला ५ प्रमुख मागण्यांचे निवेदन
महाबळेश्वर: शहराच्या हितासाठी शिवसेनेच्या ५ प्रमुख मागण्या:▪️वाहनतळ व्यवस्थापन:हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकाजवळील ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ’ खाजगी भाडेतत्त्वावर न देता नगरपरिषदेने स्वतःच्या ताब्यात ठेवावे. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल आणि महसुलातही भर पडेल.
▪️सीसीटीव्ही यंत्रणा:शहराच्या सुरक्षेसाठी मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, वेण्णा लेक नाका, महाड नाका आणि सातारा नाका यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय तातडीने सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा.
▪️जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता:विल्सन पॉइंट येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची टाकी पावसाळ्याच्या काळात नियमितपणे स्वच्छ केली जावी, जेणेकरून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल. ▪️रस्ते दुरुस्ती आणि चिखलाचा बंदोबस्त: फॉरेस्ट ऑफिस ते भारत हॉटेल या मार्गावर सुरू असलेल्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
▪️आठवडे बाजार रस्ता: एल. सी. डिसोझा मार्गावर सुरू असलेली विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, ज्यामुळे स्थानिक महिला आणि नागरिकांना होणारा त्रास थांबेल.
▪️प्रशासनाला इशारा:
यावेळी शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, युवा सेनेचे आकाश साळुंखे, उपशहर प्रमुख राजेश साळवी, शाहनवाज भाई खरखंडे, सुशांत (आबा) पारठे, आरोग्य सेनेचे अमोल साळुंखे, अल्ली भाई वारुणकर, समीरभाई तांबोळी, ज्येष्ठ नागरिक अशोक (मामा) शिंदे, तेजस बोधले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यास आणि लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.




