साताऱ्यात ठाकरेंच्या शिलेदाराने पुकारले बंड शिवसेनेला साताऱ्यात सर्वात मोठा झटका; एस.एस. पार्टे गुरुजींनी अपक्ष भरला उमेदवारी अर्ज
सातारा दि.२९: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ शिवसैनिक व ऐतिहासिक जावळीच्या राजकारणातील बलाढ्य व्यक्तिमत्व एस.एस. पार्टे गुरुजींनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एस. एस. पार्टे गुरुजींनी बंडाची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीतील तिढा वाढणार असल्याचे चित्र आहे. आता मात्र जावळीत पार्टे गुरुजींच्या बंडाच्या भूमिकेमुळे तिरंगी लढत होणार आहे.
महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते सातारा जावळीतील ज्येष्ठ शिवसैनिक व कायम शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले एस एस पार्टे गुरुजींची समजूत काढण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऐतिहासिक जावळीतील ठाकरेंच्या या शिलेदाराने बंडाचा झेंडा हाती घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अमित कदम यांची सातारा जावळीतून उमेदवारी घोषित झाली. यामुळे पार्टे गुरुजींच्या उमेदवारीसाठी सुरुवातीपासून आग्रह धरलेले शिवसैनिक नाराज झाल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट विचारसरणीच्या सर्वसामान्य शिवसैनिकाला निवडणुकीची वारंवार तयारी करून देखील लढण्याची संधी डावलली जात आहे. त्यामुळे सोबतच्या शिवसैनिकांचे आणि मतदारांचे सातत्याने खच्चीकरण होत असल्याचे यावेळी शिवसैनिकांनी नमूद केले.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पार्टे गुरुजी म्हणाले की, हा जनसामान्यांनी दिलेला आदेश आहे. विचारांवर निष्ठा असणारा सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध प्रस्थापित अशी ही निवडणूक असून मी अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे. ही लढाई धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची आहे. सर्वसामान्य जनता ज्यावेळी निवडणूक आपल्या हातात घेते. संघर्ष करते आणि प्रस्थापितांचे मलिदा, टक्केवारी, कमीशन, हुकूमशाहीचे राजकारण उध्वस्त करण्यासाठी समोर येते; त्यावेळी विजय हा नैतिकतेचा होतो. त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे. बेरोजगारी, महागाई ठेकेदार पॅटर्न हे आता सर्वसामान्यांच्या लक्षात आलेले आहे. सुज्ञ जनता या सर्व गोष्टींना वैतागली आहे. ते पुढे म्हणाले की, मी वारकरी सांप्रदायातील व्यक्ती आहे. समोर कोणीही असो मला काही फरक पडत नाही. कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या आग्रहावर मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा मिळेल का? या प्रश्नावर त्यांनी राज्यभरात मोठी राजकीय उलथापालथ सुरू असून सध्या काहीही सांगता येणार नाही असे संकेत दिले. कार्यकर्त्यांचा व जनतेचा निर्णय हा माझ्यासाठी अंतिम आहे त्यामुळे मी निवडणुकीला सामोरे जात आहे.
आता मात्र पार्टे गुरुजी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे जावळीत तिरंगी लढत होणार असून कागदावर महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजेंचं पारड जड दिसत असलं तरी पार्टे गुरुजींच्या बंडखोरीमुळे जावळीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले तसेच महाविकास आघाडीचे अमित कदम यांच्या अडचणी वाढणार आहेत.
उमेदवारी नाकारल्याने पार्टे गुरुजी नाराज..?
सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आयात उमेदवार अमित कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पार्टे गुरुजी यांच्यासह त्यांच्या समर्थकांना धक्का बसला.आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर पार्टे गुरुजींनी सांगितले की “मला अगोदर कामाला लागा असे सांगण्यात आले. त्यामुळे मी गेल्या अनेक दिवसांपासून पदयात्रा आणि मतदारांच्या भेटी सुरू केल्या होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतलाय, तो सामान्य शिवसैनिकांना अनपेक्षित आहे. गेल्या चार दशकांपासून मी व माझे कुटुंबीय शिवसेनेसोबत (ठाकरे गट) एकनिष्ठ आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सगळे कामाला देखील लागले होते. मात्र, अचानक काय झाले, हे कळलं नाही”, असं म्हणत पार्टे गुरुजींनी नाराजी व्यक्त केली.
