स्व.आनंद कोल्हापुरे यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १० जून रोजी वाई येथे
वाई – उत्कर्ष पतसंस्था मर्यादित, वाई आणि वाई जिमखाना वाईचे संस्थापक, समाजभान व दूरदृष्टी असलेले दिवंगत स्व. आनंद कोल्हापुरे यांच्या समृद्ध जीवनकार्यावर आधारित आणि त्यांच्या सहधर्मचारिणी श्रीमती अनुराधा आनंद कोल्हापुरे लिखित “सहजीवनातील आनंद” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. सत्यवती जोशी सभागृह, कन्याशाळा, मधली आळी, वाई येथे संपन्न होणार आहे.
स्व. कोल्हापुरे यांचे सहकार क्षेत्रातील योगदान, समाजसेवा, क्रीडाक्षेत्रातील योगदान आणि लोकहितार्थ कार्य हा त्यांच्या जीवनप्रवासाचा अविभाज्य भाग होता. त्यांनी सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारे जे कार्य केले, ते आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन मा. सुमनताई लक्ष्मणराव पाटील आणि ज्येष्ठ लेखक व व्याख्याते डॉ. यशवंत पाटणे यांच्या शुभहस्ते होणार असून, त्यांच्यासोबत मा. विद्या पोळ-जगताप (प्रसिद्ध लेखिका व उपयुक्त नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन), मा. विनोद कुलकर्णी (कोषाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ), मा. सुनील शिंदे (उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी साहित्य, समाजसेवा आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर, वाई नगरीतील नागरिक आणि स्व. कोल्हापुरे यांच्याशी जोडलेले असंख्य हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्याला सर्व साहित्यप्रेमींनी, सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व वाईकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उत्कर्ष नगरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी केले आहे.
