साताऱ्यात ‘महाएप्टिकॉन २०२६’ राज्यस्तरीय परिषद अभूतपूर्व उत्साहात संपन्न
फार्मसी शिक्षक सक्षमीकरण, नवतंत्रज्ञान आणि संशोधन विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; राज्यभरातील शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
सातारा :असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने आयोजित “महाएप्टिकॉन 2026” ही राज्यस्तरीय परिषद राजधानी सातारा कितीउत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडली. प्रभावी संकल्पनेवर आधारित या परिषदेत राज्यभरातील फार्मसी शिक्षक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले. फार्मसी शिक्षणातील बदलते प्रवाह, आधुनिक अध्यापन पद्धती, संशोधन आणि नवतंत्रज्ञान या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन या परिषदेत करण्यात आले.
फार्मसी शिक्षकांसाठी, शिक्षकांद्वारे आणि शिक्षकांची अशी अनोखी संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेली ही परिषद महाराष्ट्रातील फार्मसी शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली. दिवसभर विविध तांत्रिक सत्रे, पॅनल चर्चासत्रे आणि मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. या सत्रांमध्ये तज्ज्ञांनी फार्मसी शिक्षणातील नवे ट्रेंड आधारित शिक्षण साधने, डिजिटल टूल्स, संशोधन व पेटंट संस्कृती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
एपीटीआय ही देशातील फार्मसी शिक्षकांची अग्रगण्य राष्ट्रीय संस्था असून तिची स्थापना सन १९६६ मध्ये प्रा. एम. एल. श्रॉफ आणि प्रा. जी. पी. श्रीवास्तव यांसारख्या दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे. फार्मसी शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, संशोधनाला चालना देणे आणि शिक्षकांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशभरातील हजारो फार्मसी शिक्षकांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून संस्था कार्यरत आहे.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.एपीटीआय महाराष्ट्र राज्य शाखा ही देशातील सर्वाधिक सक्रिय शाखांपैकी एक मानली जाते. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ‘महाएप्टिकॉन २०२६’ परिषद राज्यातील फार्मसी शिक्षकांसाठी ज्ञानविनिमयाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.
परिषदेत उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, परिणामकारक मूल्यांकन तंत्र आणि संशोधनाधारित शिक्षण या विषयांवर विविध तज्ज्ञांनी आपले अनुभव मांडले. औषधनिर्मिती क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, आरोग्यसेवा क्षेत्रातील नव्या संधी आणि औषधोपचारातील गुणवत्ता वाढविण्याबाबतही चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.
या परिषदेत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला. संशोधन, अध्यापन, प्रशासन आणि सामाजिक योगदान या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या फार्मसी शिक्षक व संस्थांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कारांमुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळून फार्मसी शिक्षणाची गुणवत्ता अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना अद्ययावत ज्ञान, संशोधनाची दिशा आणि नव्या तंत्रज्ञानाची ओळख मिळाली. तसेच फार्मसी शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरली.
जिल्हा परिषद, सातारा सदस्य डॉ. प्रियाताई महेश शिंदे, क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वारिंदर कंवर, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाच्या एज्युकेशन रेग्युलेशन कमिटीचे चेयरमन डॉ. दीपेंद्र सिंग, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाचे सदस्य श्री. विजय पाटील, ए पी टी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद उमेकर, उपाध्यक्ष डॉ. सोहन चितलांगे, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राकेश सोमाणी, यशोदा ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, डॉ. विजयसिंह माने, डॉ. बी पी रोंगे, सुधीर नाना पवार, डॉ. नामदेव जाधव आदि मान्यवर उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होते.
एकूणच साताऱ्यात संपन्न झालेली “महाएप्टिकॉन २०२६” परिषद फार्मसी शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरली असून राज्यातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर नेण्यासाठी ती महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




