समाजाला फार मोठी दिशा देण्याचे काम व कवी करतात-लोकनेते रामशेठ ठाकूर
आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे दिंडीतले वारकरी
प्राचार्य शंकरराव उनउने राष्ट्रीय मराठी कोकणी बोली कविता लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण व ‘बोलीगंध’ कविता संग्रहाचे प्रकाशन
सातारा :‘ मित्रानो ! मी भाजपवाला असल्याने काहीजण आम्हाला अंधभक्त म्हणतात. पण मी अंधभक्त नाही. आम्ही शाहू,फुले आंबेडकरांचे दिंडीतले वारकरी आहोत.देवावर भक्ती आहे.सर्वाना समता, स्वातंत्र्य ,समानता,बंधुभाव हे सर्व राज्य घटनेत आहे.संविधानावर आमची भक्ती आहे.आपल्यातल्या विवेकवादाला जागवायचे असा विचार या कवीचा आहे. डोळस होण्याचे विचार कवी देतो .समाजाला फार मोठी दिशा देण्याचे काम कवी करतात’’ असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये भाषा मंडळ व मराठी विभागाने प्राचार्य शंकरराव उनउने राष्ट्रीय मराठी व कोकणी बोली भाषेतील कविता लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणाऱ्या उपेंद्र रोहनकर यांच्या ‘डोळस व्हायचं’ या कविता संग्रहातील शीर्षक कविता त्यांनी वाचून दाखवली. त्या संदर्भाने आपली भूमिका ते उपस्थित कवींच्यापुढे व्यक्त करत होते. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकात दळवी हे होते .तर संस्थेचे सचिव विकास देशमुख, संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, संस्थेच्या ऑडीट विभागाचे सहसचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, सहसचिव बी.एन.पवार अमोल उनउने, मीनल उनउने,मा.वाय.टी.देशमुख,डॉ.तारळेकर,विजय उनउने,जनरल बॉडी सदस्य पाटील, प्रा.डी.ए.माने,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य शंकरराव उनउने यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले ‘ प्राचार्य बापूसाहेब उनउने हेच माझे खरे गुरु होते. जीवनात मी आदर्श मानतो त्यात ते कर्मवीर अण्णा शाहू फुले आंबेडकर ही देशाची दैवते आहेत.पी.डीपासून पुढे ४ वर्षे मी छ. शिवाजी कॉलेजला शिकलो त्यावेळी आम्हाला एस. के उनउने हे प्राचार्य होते.त्यावेळी माझा मराठी हा स्पेशल विषय होता. शेवटच्या वर्षाला महाराष्ट्राची संत परंपरा नावाचा पेपर ते शिकवीत. ते केवळ पुस्तक शिकवत नसत तर प्रत्यक्ष वागत असत. द. ता.भोसले नाटक शिकवायचे.दोन वाक्य चार वाक्य ते फेकायचे. त्यामुळे मराठीची आम्हाला माझी आवड वाढली आणि मला शिक्षकच व्हायला पाहिजे अशी इच्छा त्यावेळी झाली आणि मी प्रथम शिक्षक झालो. पुढे मी उद्योगपती झालो तरी पण माझा पाया हा छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रचला गेला हे मला जाणवते.
कवी आणि कवियत्री यांना काही लागते मला माहीत आहे. त्याना काय लागते ? तर प्रेमाची आणि आशीर्वादाची थाप लागते. टाळी वाजवली तर बरे वाटते.पैसे नकोत. पण तसे दिले तरी चालतील.गरजे करता ते आवश्यक आहे.. मराठी संत साहित्य शिकविताना बापूनी आम्हाला शिकविले ‘ फोडले भांडार धन्याचा हा माल । मी तो हमाल भारवाही’. आपले काहीच नसतं, जी कमाई केली ,जे पैसे कमावले ते आपले आहे का ? येताला आणले नव्हते आणि जाताना घेऊन जाणार नाही. कुणीतरी मला कर्ण बीर्ण काही लोक म्हणतात . इतके काही आपण नाही. कारण संतानी म्हटले ‘ सोने आणि माती आम्हा सारखीच चित्ती’ इतका काही परोपकार आपण करू शकत नाही. परंतु त्याचा काही अंश,काही भाषा आम्ही जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे वाटते. आपल्याकडे ते आलंय. डोक्यावर पाण्याचा हंडा वाहणारा ,लाकडाची मोळी आणणारा घेणारा, लेबरस्कीमला काम करणारा असा एक विद्यार्थी उद्योगपती होतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पराभूत करून पार्लमेंटमध्ये निवडून जातो, आता एवढे मोठे यश मिळाल्यानंतर आम्हाला वाटते हे सर्व अण्णांच्या कृपेने मिळाले आणि उनउने साहेबांच्या आशीर्वादाने मिळाले आणि त्यांची वागणूक तशी होती. ते लंडनला गेले,डोक्यावर हॅट घालायचे पण ते माणसात मिळून मिसळून वागायचे असे बापू होते. साहित्य हे मनोरंजन करते ,परंपरेतल्या काही गोष्टी पुढे नेण्याचे काम करते आणि विशेष म्हणजे ते शिक्षणाचे साधन आहे असे ते म्हणाले
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत दळवी म्हणाले की प्राचार्य शंकरराव उनउने यांच्या नावाने सुरु केलेली राष्ट्रीय मराठी व कोकणी बोली भाषा स्पर्धा घेणे ,मराठी भाषा प्रयोगशाळा तयार करणे आणि त्यांच्या नावाने स्मृती दालन सुरु करणे हे प्रस्ताव अमोल उनउने व मीनल उनउने यांनी महिन्यापूर्वी सादर केले होते.संस्थेने त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली एक चांगल्या प्रकारचे स्मारक झालेले आहे. खरोखर प्रस्ताव दिल्यापासून अवघ्या ४ महिन्यात ही अंमल बजावणी झाली. ही बोलीभाषा कवितेलेखन स्पर्धा घेतली आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत उनउणे साहेबांचे कार्य पोचवण्याचे अप्रतिम काम गेले आहे. विशेष म्हणजे सगळ्या कवितांचा एकसार असणारा ‘बोलीगंध’ नावाचा कविता संग्रह तयार करण्यात आला, तसेच ज्या चांगल्या कविता होत्या त्यांना पुरस्कार देण्यात आले. शंकरराव उनउने साहेब असते आणि नातू अमोल आणि नात सून होणार आहेत असे कळले असते तर तर त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा असे वाटले असते असे ते म्हणाले. आज जीवंत आई बापाला सांभाळायची तयारी नाही असे वातावरण आहे आणि आज आजोबा हयात नसताना त्यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी अमोल व मीनल उनउने हे चांगले काम केले आहे. हे उदाहरण अतिशय दुर्मिळ असे आहे.
प्राचार्य शंकरराव उनउने हे कर्मवीरांचे निष्ठावंत अनुयायी होते. शिक्षण घेताना त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी आजन्म काम करण्याची शपथ घेतली होती. छत्रपती शिवाजी कॉलेजला ते ११ वर्षे प्राचार्य होते .त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अनेक विद्यार्थ्यांच्यावर पडला,त्यातूनच रामशेठ ठाकूर साहेब व ,प्रा.डी.ए.माने सारखे अनेक विद्यार्थी तयार झाले असे ते म्हणाले. अमोल ,उनउने,मीनल उनउने,प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी बोलीगंध कवितासंग्रह, भाषा प्रयोगशाळा व स्मृतीदालन यासाठी खूप मेहनत घेतली असे सांगून त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्र व इतर राज्यातून कवी आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रामशेठ ठाकूर साहेब यांचे मराठीतले भाषण ऐकून आपण प्रभावित झाल्याचे सांगून , मराठीसाठी त्यांचे संत साहित्यावर स्वतंत्र भाषण ठेवायला हवे इतके अप्रतिम भाषण झाल्याचे सांगितले. सचिव विकास देशमुख यांनी मराठी विभागाने मोठा कार्यक्रम केल्याचे सांगून एकाच वेळी अनेक चांगल्या गोष्टी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि या पुढच्या काळात साहित्य संबंधात मोठे आयोजन करु असे आश्वासित केले. प्रा.डी.ए.माने यांनी ह्या कॉलेजच्या जडणघडणीत प्राचार्य शंकरराव उनउने यांचे फार मोठे योगदान होते अशी माहिती दिली. तसेच ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले असते असेही मत त्यांनी व्यक्त केले. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी रामशेठ ठाकूर पुरस्कृत साहित्य गौरव पुरस्कार देण्याची कल्पना मांडली ,त्यावेळी प्रा,डी.ए.माने यांनी ‘लोकनेते रामशेठ ठाकूर साहित्य गौरव पुरस्कार’छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागातून यापुढे देण्याविषयी अनुमोदन दिले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज ,कर्मवीर भाऊराव पाटील व प्राचार्य शंकरराव उनउने यांच्या प्रतिमेस फुले वाहण्यात आली. या पारितोषिक वितरण व ‘बोलीगंध’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन समारंभात प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख व स्पर्धा समन्वयक, उपप्राचार्य डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले. मिनल उनउने यांनी कविनी सहभाग दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व प्राचार्य शंकरराव उनउने यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभास महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून आलेले सहभागी कवी व त्यांचे कुटुंबीय ,नातेवाईक,विद्यार्थी व प्राध्यापक यावेळी हजर होते.
