अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » सह्याद्रीत उभा राहिला भव्य स्काय ब्रिज; खेड–महाबळेश्वर प्रवासाला नवी गती

सह्याद्रीत उभा राहिला भव्य स्काय ब्रिज; खेड–महाबळेश्वर प्रवासाला नवी गती

सह्याद्रीत उभा राहिला भव्य स्काय ब्रिज; खेड–महाबळेश्वर प्रवासाला नवी गती

महाबळेश्वर -महाबळेश्वर परिसरातील पर्यटन आणि वाहतूक सुविधांना मोठी चालना देणारा भव्य स्काय ब्रिज सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे खेड–महाबळेश्वर दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार असून स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठा फायदा होणार आहे.

डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या या भागात प्रवासासाठी सध्या वळणावळणाच्या घाटरस्त्यांवर अवलंबून राहावे लागते. स्काय ब्रिजच्या माध्यमातून प्रवासाचे अंतर आणि वेळ दोन्ही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे महाबळेश्वर, पाचगणी आणि कोकणातील पर्यटनस्थळांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अधिक जवळ आणणारा, पर्यटन व उद्योग क्षेत्राला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी केबल स्टेड स्काय ब्रिज आता पूर्णत्वास आला असून पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरशी जोडणाऱ्या या पुलामुळे दोन्ही भागांतील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

           मुंबईतील वरळी सी-लिंकच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या पुलासाठी सुमारे १७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ५४० मीटर लांबी आणि १४ मीटर रुंदी असलेल्या या भव्य पुलामुळे खेड ते महाबळेश्वर दरम्यानचे अंतर जवळपास ५० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे पोलादपूरमार्गे आंबेनळी घाटाचा मोठा फेरा वाचणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. तापोळा परिसरातून कोकणातील गाढवली-आहिर भागाला जोडणारा हा पूल कोयना बॅकवॉटर परिसरातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली असून काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.

या पुलामुळे खेड तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे. रघुवीर घाटातील नैसर्गिक सौंदर्य, दुर्मीळ लाल खेकड्यांचे दर्शन तसेच सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. पुलाच्या मध्यभागी ४३ मीटर उंचीची व्ह्यू गॅलरी उभारण्यात आली आहे. येथे जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट तसेच जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणावरून कोयना बॅकवॉटर, सह्याद्री पर्वतरांग तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताची मोहक दृश्ये अनुभवता येणार आहेत.

दुर्गम गावांचा संपर्क कायमस्वरूपी

नवीन पुलामुळे कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या शिंदी, वळवण, उचाट, आकल्पे, दरे यांसह २१ गावांना वर्षभर सुरक्षित संपर्क उपलब्ध होणार आहे. बार्जद्वारे करावा लागणारा जीवघेणा प्रवासही टळणार आहे.

उद्योग आणि रोजगाराला चालना

या मार्गामुळे कोकण आणि सातारा जिल्ह्यांमधील व्यापार, पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला नवी संधी उपलब्ध होणार आहे. स्थानिक युवकांसाठी पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिलेला हा स्काय ब्रिज केवळ वाहतुकीचा दुवा नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा नवा मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket