सह्याद्री कारखान्याजवळच्या शहापूर गावात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात तीन तरुण जखमी, गावकऱ्यांमध्ये दहशत
उसाच्या शेतात पाणी देताना बिबट्यानं हल्ला केलेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तीन तरुण जखमी झाले आहेत. वनविभागानं बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
कराड (ज्ञानेश्वर शेवाळे)-सह्याद्री सहकारी साखर कारखाना परिसरातील शहापूर (ता. कराड) गावात बिबट्यानं शनिवारी दुपारपासून धुमाकूळ घातला आहे. उसाच्या शेतात पाणी पाजणारे तीन तरुण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. निखिल मारुती वांगडे, जयवंत बबन फसाले आणि सौरभ श्रीकांत कदम, अशी जखमींची नावं आहेत. त्यांच्यावर कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, वन विभागानं घटनास्थळाची पाहणी करुन ट्रॅप कॅमेरे आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजराही लावला आहे. मात्र गावातील तीन तरुणांवर बिबट्यानं हल्ला केल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
उसाच्या शेतात पाणी देताना झाला हल्ला : या संदर्भात शहापूर ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल वांगडे हा मोठ्या कॅनल जवळच्या शेडगे शिवारातील उसाच्या शेतात पाणी सोडत होता. शनिवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. उपचारासाठी त्याला कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर रविवारी सकाळी शहापूर-रिसवड मार्गानजीकच्या शेतात पाणी सोडत असताना जयवंत बबन फसाले या तरुणावर बिबट्यानं हल्ला केला. त्यात तो देखील जखमी झाला असून त्यालाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. या दोन घटनांमुळे वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करुन पिंजरा लावण्याची तयारी करत होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी त्याठिकाणी उपस्थित होते. तोवर खालच्या शिवारात बिबट्यानं सौरभ कदम या तरुणावर हल्ला केला. त्यात त्याचं डोकं, चेहरा आणि हात रक्तबंबाळ झाला. जखमी अवस्थेत तो घरी आल्यानंतर ही घटना ग्रामस्थांना समजली. दरम्यान, रात्री चारचाकी गाडीतून शेतात जाताना दोन बिबटे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे सह्याद्री कारखाना परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागानं लावला पिंजरा : सह्याद्री कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर शहापूर गाव आहे. त्यामुळे बिबट्यानं धुमाकूळ घातल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. शहापूर ग्रामस्थांनी वन विभागाला कळवल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील या पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाल्या. परिसराची पाहणी केल्यानंतर शेतात वावरताना काय काळजी घ्यायची, याबद्दल त्यांनी सूचना केल्या. तसेच घटना घडलेल्या परिसरात ट्रॅप कॅमेरे आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावण्यात आला अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांनी दिली.




