सातारा महावितरणातील कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा; आरपीआय (ए)चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
सातारा, दि. २६ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या वतीने सातारा महावितरण विभागातील वीजजोडणी, टेंडर प्रक्रिया, निधी मंजुरी आणि प्रशासकीय कामकाजात कथित भ्रष्टाचार, टक्केवारी प्रथा, दलाली, सत्तेचा गैरवापर तसेच प्रामाणिक अधिकाऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी यांच्याकडे उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ आणि जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात, संबंधित अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही बदल्या झाल्या नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, शासनाच्या NSC योजनेअंतर्गत शासन निधीतून होणाऱ्या कामांना मंजुरी देण्यासाठी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास मंजुरी जाणीवपूर्वक रोखली जाते, असा आरोप करण्यात आला आहे.
तसेच टेंडर प्रक्रियेत काही मोजक्या ठेकेदारांनाच कामे देणे, मनमानी टक्केवारी मागणे, पैसे न देणाऱ्या ग्राहक व ठेकेदारांची कामे अडवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे आणि लोकप्रतिनिधींची नावे सांगून चुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व टेंडर व मजुरीच्या कामांची मुख्य कार्यालयामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा दिपक भाऊ निकाळजे आणि दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी सोमनाथ धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे निवेदन शितल बल्लाळ, सोमनाथ धोत्रे, दामिनी निंबाळकर, महेश खेडुतोंडे, रामभाऊ मदाळे, वंदना सगरे आदींच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.




