रोहोट परिमंडळात ‘शिकार मुक्त अभियान’ सुरू; अवैध कृत्यांवर कडक कारवाईचा इशारा
सातारा प्रतिनिधी :रोहोट वन परिमंडळातील रोहोट, खडगाव व धावली या नियतक्षेत्रांतील सर्व गावांमध्ये ‘शिकार मुक्त अभियान’ राबविण्यात येत असल्याची माहिती वनपाल राजाराम काशीद यांनी दिली. अवैध शिकार, जंगल क्षेत्रात आग लावणे, विनापरवाना अतिक्रमण तसेच मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना तात्काळ वनविभागाला कळवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वनसंपदेचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगताना, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल व योग्य बक्षीस देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीक नुकसान, पशुधन हानी किंवा मनुष्यहानी झाल्यास शासनामार्फत नुकसानभरपाई दिली जाते, याचीही माहिती देण्यात आली.
अवैध शिकारीस आळा घालण्यासाठी पोलिस विभागाच्या धर्तीवर गोपनीय खबऱ्यांचे जाळे तयार करण्यात आले असून रात्रगस्त सुरू करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या बैठका घेऊन जनजागृतीही करण्यात येत आहे.
वनपाल काशीद यांनी सांगितले की, भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 9 नुसार अवैध शिकार करणाऱ्यांना 3 ते 7 वर्षांपर्यंत कारावास व 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
तसेच अवैध वृक्षतोड किंवा जंगलातील आग लावण्याच्या घटना आढळल्यास जवळच्या वनरक्षक किंवा वनपाल यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण संवर्धन आवश्यक असून प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा संकल्प करावा, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले.




