समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळला
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाला सुरुवात होऊन अजून दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत, तोच माळीवाडा येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळला आहे. यावेळी स्लॅब कोसळला त्यावेळी सुदैवाने खालच्या बाजूने वाहने जात नसल्याने मोठी अनर्थ टळला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मेघा कंपनीने तात्काळ दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जा संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. या महामार्गाच्या माध्यमातून लांब पल्याचा अंतर कमी वेळेत पूर्ण होईल असं सांगण्यात आलं. मात्र, हा महामार्ग पूर्ण होऊन दोन वर्षे होत नाही तोच या महामार्गाच्या कामाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा येथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब अचानक कोसळला, यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
धुळे सोलापूर महामार्गाच्यावरच्या बाजूला असलेला हा स्लॅब कोसळल्याने मोठा खड्डा पडला. सुदैवाने खालच्या भागात वाहने नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तसेच समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या रस्त्यात हा खड्डा आला नसल्याने सुदैवाने अनुचित प्रकार टळला. दरम्यान याच वेळी पाऊस आल्याने धुळे सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी व रिक्षा चालकांना यामध्ये त्रास झाला.
अधिकाऱ्यांनी घेतली घटनास्थळी तात्काळ धाव
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग विभागाने तात्काळ समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मेघा कंपनीला माहिती देऊन तात्काळ दुरुस्ती करण्याच्या आदेश दिले. कंपनीने देखील या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वकांक्षा असलेला हा प्रकल्प अवघ्या दोन वर्षांमध्येच निकृष्ट दर्जाच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. यामुळे या महामार्गाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचत आहे.
