निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले सादर करावेत जिल्हा कोषागार अधिकारी, श्रीमती आरती नांगरे
सातारा : माहे डिसेंबरचे निवृत्तीवेतन वेळेत जमा होण्यासाठी कोषागार कार्यालय, सातारा मार्फत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी दि.30 नोव्हेंबर 2025 अखेर हयातीचे दाखले सादर करण्याबाबत कार्यवाही करावी,असे आवाहन सातारा जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी केले आहे.
सातारा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दि.1 नोव्हेंबर 2025 रोजी हयात असल्याबाबतचा दाखला ते ज्या बँकेमधून निवृत्तीवेतन घेत आहेत त्या बँकेत जाऊन दिनांक 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीच्या दाखल्यांच्या नोंदवहीमध्ये आपल्याच नावासमोर खात्री करुन स्वाक्षरी अंगठा करणे आवश्यक आहे. यासाठी हयातीच्या दाखल्यांची नमुना नोंदवही या कोषागारमार्फत सर्व बँकांकडे, शाखांकडे पुरवण्यात येणार आहे. मनीऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांना या कार्यालयामार्फत हयातीचे दाखले देण्यात येतील. त्यांनी त्यांच्या दाखल्यावर पोस्ट मास्तर अथवा शासकीय राजपत्रित अधिकारी यांची सही, शिक्का घेवून या कार्याल्यास पाठविण्यात यावेत. हयातीच्या दाखल्यावरील मजकूर अचूकरित्या भरुन देणे आवश्यक आहे. तसेच परदेशात राहत असलेल्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी विहीत मार्गाने जिल्हा कोषागार कार्यालयास हयातीचे दाखले प्राप्त होतील याची दक्षता घ्यावी.
हयातीचे दाखले देण्याच्या पध्दतीव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने हयातीचे दाखले डिजीटल पध्दतीने जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल. यासाठी https://jeevanpramaan.gov.in या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात देण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केलेली आहे
वित्त विभागाच्या 7 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.दहा नुसार ज्या महिलांना निवृत्तीवेतन मंजूर झाले आहे, अशांनी जिल्हाधिकारी किंवा तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला व पुनर्विवाह न केलेबाबतचे व उपजिविकेची सुरुवात न केलेबाबत स्वयं घोषणापत्र प्रतिमाह या कार्यालयास सादर करावे. ज्यांचे दाखले दि.30 नोव्हेंबरअखेर सातारा कोषागार कार्यालयात प्राप्त होणार नाहीत अशांचे माहे डिसेंबर 2025 चे निवृत्तीवेतन संगणक प्रणालीद्वारे आपोआप थांबविले जाणार असल्याचे नोंद सर्व निवृत्तीवेतनधारकांनी घ्यावी, असेही जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती नांगरे यांनी कळविले आहे.




