आरसीबी पुन्हा अभेद्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन
आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १५६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १८ व्या षटकात पूर्ण केलं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी अवघ्या १५६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी वेंकटेश अय्यर आणि विराट कोहलीची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. वेंकटेश अय्यरने ३२ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने नाबाद ७५ धावा चोपल्या. देवदत्त पडिक्कल १ धाव करुन बाद झाला. त्यानंतर टीम डेव्हिड २४ आणि क्रृणाल पंड्या १ धाव करुन माघारी परतला. शेवटी विराटने षटकार मारुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजय मिळवून दिला.
या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करतान गुजरात टायटन्सला नेहमीप्रमाणे हवी तशी सुरुवात मिळाली नाही. साई सुदर्शन अवघ्या १२ तर शुबमन गिल अवघ्या १० धावा करुन माघारी परतला.त्यानंतर निशांत सिंधू २० धावांवर माघारी परतला. जोस बटलर १९ धावा करुन माघारी परतला. अर्शद खानने १५, राहुल तेवातियाने ७ , जेसन होल्डरने ७ आणि शेवटी वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने २० षटकांअखेर ८ गडी बाद १५५ धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गेल्या १८ हंगामात एकही जेतेपदाची ट्रॉफी जिंकू शकला नव्हता. पण रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेत इतिहास घडवला आहे. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला पराभूत करत पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. आता २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करुन जेतेपद राखलं आहे.




