पृथ्वीराज चव्हाण नाम हि काफी है-आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील
मलकापूर : चांदा ते बांदा पृथ्वीराजबाबांना कोणी चुकीचे बोलत नाही. एवढी पुण्याई व कर्तृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री असताना स्वतःचे घर भरण्यासाठी काही केले नाही. दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारे नेतृत्व आहे. मला कराड दक्षिणच्या मातीचा कल स्पष्ट दिसत आहे. कराडच्या भूमीला मोठे करणे, तुमची सेवा करणे हे पृथ्वीराजबाबांचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ आपण त्यांना द्यायचे आहे. त्यांचा दरारा काय आहे, हे आम्ही जवळून पाहिले आहे. हे नेतृत्व आपल्याला जपायला हवे. यांच्याबद्दल एकच सांगता येईल. पृथ्वीराज चव्हाण नाम हि काफी है. असे प्रतिपादन माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.
मलकापूर येथे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, मनोहर शिंदे, अजितराव पाटील – चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, नितीन काशिद, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, नीलम येडगे, शंकरराव खबाले, नामदेव पाटील, अॅ ड. नरेंद्र नांगरे – पाटील, शिवाजीराव थोरात, विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. सतेज पाटील म्हणाले, कराड दक्षिणच्या जनेतेने पुन्हा पृथ्वीराजबाबा महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले पाहिजेत. यासाठी आपली जबाबदारी व एकत्र ताकद दाखवूया. महाराष्ट्रातील जनतेच्या भूमिका ऐकल्या तर आपण अचंबित होतो. महागाईने सर्वजण त्रस्त आहेत. निवडणुकीच्या दोन दिवसात खिडकीतून आणि दारातून अमिष येतील. पण या गोष्टीना बळी न पडता बाबांना निवडून द्या. कराडची जनता कोल्हापूरपेक्षा भारी आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात सत्ताबदल होणार, नवीन सरकार येणार व २०१० ते २०१४ या कराड दक्षिणेचा जेवढा विकास झाला त्यापेक्षा जास्त विकास होणार आहे. राज्यातील उद्योग गुजरातला पळवले. त्यामुळे राज्यात कोणी गुंतवणूक करायला तयार नाही. कराडच्या एमआयडीसीत विस्तार करण्यास मर्यादा असल्याने कराड व मलकापूर येथे आयटी हब करण्याचे माझे स्वप्न आहे.
मनोहर शिंदे म्हणाले, माजी आ. भास्करराव शिंदे यांच्या कल्पनेतून मलकापूर ग्रामपंचायत नगरपंचायत झाली. व दहा वर्षापूर्वी २४ बाय ७ योजना सुरू झाली. या शहराच्या विकासासाठी माजी खा. आनंदराव चव्हाण व प्रेमलाकाकी यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही या शहरासाठी काडीमात्र संबंध नाही. नगरपरिषद करतानाही या भाजपच्या मंडळींनी विरोध केला.
अॅ ड. उदयसिंह पाटील म्हणाले, विकासाच्या सूत्रावर विलासकाकांनी मतदारसंघाची बांधणी केली. पृथ्वीराजबाबांनी याच विचारसरणीवर विकासाचे पर्व उभे केले आहे. विरोधी मंडळी प्रतिगामी व व्यक्तिकेंद्रित विचाराचे आहेत. ते सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. ते उद्योगधंद्याच्या नावाखाली समाजाला वेठीस धरत आहेत.
यावेळी कलाकार महासंघाच्यावतीने अनिल मोरे यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण जाहीर पाठिंबा दिला. तर रुग्ण हक्क समितीच्या वतीने उमेश चव्हाण यांनीही पाठिंबा दिला. तसेच यावेळी विंग येथील हनुमान वॉर्डमधील दीडशे कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला.
मनोहर शिंदे म्हणाले, विरोधी उमेदवाराने दहा वर्षात मलकापूरसाठी दहा पैसे तरी आणले का? कोविडच्या काळात त्यांच्या कृष्णा हॉस्पिटलला एकातरी रुग्णावर मोफत उपचार केला का? हे त्यांनी जाहीर करावे. तुमचे हॉस्पिटल धर्मादाय संस्था आहे म्हणून तुम्ही शिक्षण कर आणि व्यवसाय कर माफ करून घेत मलकापूर नगरपरिषदेचा सुमारे एक कोटी रुपयाचा कर त्यांनी भरलेला नाही. वन खात्याच्या हद्दीवरून मलकापूरच्या मंडईत जाणारा लोकांचा रस्ता कोणी बंद केला? हे त्यांनी जाहीर सांगावे. कृष्णा हॉस्पिटलच्या भिंतीबाहेर आमची जागा आहे, असे ते म्हणतात म्हणजे तुमचे ते माझे आणि माझे ते पण माझे असे म्हणणारी ही प्रवृत्ती मलकपूरच्या विकासाला आड येत आहेत.