प्रवासी हा एकमेव केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा-आगार व्यवस्थापक महेश जाधव
महाबळेश्वर ता:१:सुरक्षित सेवेमुळे एसटी महामंडळाने गेल्या ७७वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांच्या हृदयात आपुलकीचे स्थान मिळवले आहे. सर्व आधिकारी व कामगारांच्या एकत्रित प्रयत्नांतून एसटी फायद्यातही येऊ लागली असून प्रवासी हा एकमेव केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी महामंडळाच्या सर्व घटकांनी काम केल्यास प्रवाशांचा एसटी बाबतचा विश्वास वृद्धिंगत होईल,असे प्रतिपादन महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक महेश जाधव यांनी केले.
एसटीच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त आज महाबळेश्वर बस स्थानकावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधव बोलत होते. याप्रसंगी सहायक वाहतूक अधीक्षक प्राजक्ता मोहिते, आगार लेखाकार महेश शिंदे, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ, वरिष्ठ लिपिक विकास कांबळे, वाहतूक नियंत्रक शंकर सूर्यवंशी, प्रदीप बाबर,शिवाजी भोसले, अशोक कोकाटे,जितेंद्र खैरे,जयवंत जाधव,अक्षय फडतरे ,चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते. एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त महाबळेश्वर बस स्थानकाची आकर्षकपणे सजावट केली होती. आगार व्यवस्थापक जाधव यांच्या हस्ते बसमधून प्रवास करणाऱ्या व बसस्थानकावर असलेल्या प्रवाशांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ प्रवासी बाळकृष्ण कांबळे (बिरवाडी) यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्राजक्ता मोहिते यांनी स्वागत केले. महेश शिंदे यांनी एसटी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. विकास कांबळे यांनी आभार मानले.
