पाठरवाडीतील यात्रेत युवकांवर लाठीमार भैरवनाथ पालखी सोहळ्याला गालबोट, तांबवे पंचक्रोशीतील युवकांना पालखीच घेण्यापासुन रोखले
कराड ः पाठरवाडी येथील श्री भैरवनाथ देवाचा पालखी सोहळा पार पडला. पालखी मंदिराबाहेर प्रदक्षिणेसाठी आणण्यात आल्यावर पाठरवाडीतीलच युवक त्या पालखीबरोबर होते. त्यांनी तांबवेसह पंचक्रोशीताल गावांतील युवकांना पालखी खेळवण्यासाठी घेवुन दिली नाही. संबंधित युवकांनी पालखी घेण्याचा प्रयत्न करताच तेथे उपस्थित पोलिस व होमगार्ड यांनी त्यांच्यावर लाठीमार सुरु केला. त्यात अनेक युवकांना मार लागुन ते जायबंदी झाले. काही महिलाही धक्का लागुन पडल्याने त्याही जखमी झाल्या.
पाठरवाडी येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा आज पहाटे होती. तत्पुर्वी रात्रभर वाटेगाव, काले, शेरे येथील भाविकांनी लेझीम-दांडपट्याचा कार्यक्रम सादर केला. पालखी सोहळ्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापुर, कर्नाटकातील भाविकांनी हजेरी लावली होती. आज पहाटे मंदिरात आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखी मंदिरातुन बाहेर येताच भाविकांनी त्यावर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली. पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर त्या पालखीसोबत पाठरवाडीतीलच युवक होते. पालखी मंदिराच्या दक्षिणेकडील मोकळ्या जागेत आणण्यात आल्यानंतर पाठरवाडीतील युवकांनी तांबवेसह अन्य गावातील युवकांना पालखी घेवुन नाचवण्यास मनाई केली. इतर युवकांनी पालखी घेण्याचा प्रयत्न करताच तेथे उपस्थित पोलिस व होमगार्ड यांनी त्यांच्यावर लाठीमार सुरु केला. त्यामध्ये काही अनेक युवकांना मार बसुन ते जायबंदी झाले. त्यात तेथे उपस्थित असलेल्या महिलाही धक्का लागुन पडुन त्यांनाही मार लागला.
दरम्यान मुंबईकर रहिवासी मित्रमंडळ तांबवे यांच्यावतीने यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाठी दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही मुंबईकर मंडळाचे डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. राम पवार, डॉ. अविनाश पवार, निवृत्त पोलिस निरीक्षक छगन जाधव, निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील, श्रीमंत पाटील, निवृत पोलिस उपनिरीक्षक मानसिंग ताटे, हणमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील, डॉ. प्रशांत पाटील, शरद पवार, डॉ. विकास पाटील, डॉ. आशुतोष नांगरे, भगवान चव्हाण, डॉ. प्रशांत पाटील, ओंकार पवार, गणेश पाटील, ओंकार फिरंगे यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
