रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ९ मे २०२६ रोजी “कर्मवीर पुण्यतिथी” कार्यक्रमाचे आयोजन
सातारा (प्रतिनिधी)रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, आधुनिक शिक्षण भगीरथ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा. पुण्यतिथी कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्यावतीने शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी स.८.३० वा कर्मवीर समाधी परिसर, सातारा या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित राहणार आहेत.
पुण्यतिथी कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य, जनरल बॉडी सदस्य, संस्थेचे लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, संस्थेचे हितचिंतक, पदाधिकारी, सर्व शाखांचे शाखाप्रमुख यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी देणगी रूपाने विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार मा. खा. शरदरावजी पवारसाहेब यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये थोर देणगीदार मा.रामशेठ चांगू ठाकूरसाहेब, मा. सौ शकुंतला रामशेठ ठाकूर, मा. प्रतापराव गोविंदराव पवार, अॅड. अशोक बोरा, मे.पंचशील फौंडेशन, पुणे, फिनोलेक्स केबल लि., पिंपरी, बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड व इतर मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी संस्थेच्या वतीने ‘रयत मासिक’, ‘रयत विज्ञान पत्रिका’ तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष मा. बापूसाहेब नाथाजीराव नलावडे यांनी लिहिलेले ‘कर्मवीर सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मा. खा. शरदरावजी पवारसाहेब यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक विकास करून समाजाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणा-या संस्थेच्या विविध शाखांना कर्मवीर पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणा-या प्राध्यापक व शिक्षकांना ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सातारा शहरातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे.




