मुंबई लोकल तरुणाची हत्या ! मृत तरुण मयंकच्या कुटुंबाचा टाहो ; आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी
विरार येथील मयंक लोहार याची धावत्या लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या थरारक घटनेनंतर लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “लोकलमध्ये गुंडगिरी करून आमच्या निष्पाप मुलाची हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला कठोर शिक्षा व्हावी,” अशी आर्त मागणी मयंकच्या कुटुंबियांनी केली आहे.

मयंक लोहार हा विरार पूर्वेकडील जीवदानी रोडवर असलेल्या ‘अमरनाथ अपार्टमेंट’मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत होता. मंगळवारी २३ जून रोजी रात्री काम आटोपून तो चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून घरी परतत होता. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि एका सहप्रवाशात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या माथेफिरूने मयंकची निर्घृण हत्या केली.
या घटनेमुळे मयंकच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. “ज्याने माझ्या निष्पाप मुलाला मारले, त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी करत मयंकच्या आईने एकच आक्रोश केला. लोकलमधील वाढत्या हिंसेवर मयंकचे वडील रमेश लोहार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “लोकल प्रवासात गर्दीमुळे वादविवाद होतच असतात. जरी काही वाद झाला असला, तरी अशा क्रूरपणे कोणाची हत्या नाही करायला हवी होती. आज माझ्या मुलाच्या सोबत जे घडलं, ते उद्या अन्य कोणत्याही मुलाच्या सोबत घडू नये.”
मयंकच्या मृत्यूची बातमी समजताच विरारच्या भोईरपाडा येथील ‘अमरनाथ’ इमारतीवर आणि परिसरात शोककळा पसरली. मयंकच्या आईचा हृदयद्रावक आक्रोश ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.




