महिलांच्या आर्थिक सबलीकरणात ‘बँक ऑफ महाराष्ट्र चे भरीव योगदान!- विश्वास सिद
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांचा महा कर्ज मेळावा यशवंत जिल्हा परिषद सभागृह सातारा येथे संपन्न झाला. सदर मेळावा जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री.विश्वास सिद व जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री.अंकुश मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे ३८५ हून अधिक बचत गटांना जवळपास रु १५.०० कोटी रुपयांचे कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. विश्वास सिद यांनी महिला सक्षमीकरणासाठी बँकेने दिलेल्या योगदानाबाबत बँकेचे विशेष अभिनंदन केले. मार्गदर्शन करताना श्री. सिद म्हणाले की, बचतगट योजनेप्रमाणे महिलांनी लघु-व्यवसायाकडे वळावे आपल्या परतफेडीचा रेकॉर्ड चांगला ठेवावा. वैयक्तिक कर्ज पुरवठासाठीच्या विविध शासकीय व बँक योजनांचा लाभ घेवून खऱ्या अर्थाने सबल व्हावे व बँकांनी वैयक्तिक कर्ज वाटप करण्यासाठी अधिक भर द्यावा असे आवाहन श्री. सिद यांनी केले.
आपल्या प्रास्तविक भाषणामध्ये बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. सौरभ सिंह यांनी बँकेच्या वतीने सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बँकेने सातारा जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी आजवर केलेल्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती दिली. डिजिटल व्यवहार, ग्रामीण क्रेडिट स्कोअर सामाजिक सुरक्षा विमा योजनांचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. सर्व महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय करून आर्थिक क्षमता बळकट करावी व कर्जांची परतफेड नियमित व चांगली ठेवावी असे आवाहन केले. महिला सबलीकरणासाठी बँक सदैव पाठीशी असल्याचे प्रतिपादन श्री.सिंह यांनी केले. या आर्थिक वर्षात सातारा जिल्ह्यात बँक ऑफ महाराष्ट्र ने एकूण २५८६ बचत गटांना रक्कम रुपये ८३.७५ कोटी कर्ज वितरित केले आहे.
या प्रसंगी वैयक्तिक कर्ज लाभार्थी व महिला बचत गट प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले व आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीराज साबळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रंजनकुमार वायदंडे,जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेश डीआरडीए, सर्व बीएमएम, CRP व बँक सखी DRDA यंत्रणा, अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. नितीन तळपे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र चे सर्व शाखाधिकारी व इतर स्टाफ यांनी जी मेहनत घेतली त्यांचे आभार श्री. सागर मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केल्याने उपस्थीत महिला प्रतिनिधी व बचत गट पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
