Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर: उचाट येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच छताखाली निकाली निघाले प्रलंबित प्रश्न

महाबळेश्वर: उचाट येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच छताखाली निकाली निघाले प्रलंबित प्रश्न 

महाबळेश्वर: उचाट येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच छताखाली निकाली निघाले प्रलंबित प्रश्न 

महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या संपूर्ण राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा पहिला टप्पा राबवला जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील लामज मंडलातील मौजे उचाट येथे आज भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शासकीय सेवा आता थेट जनतेच्या दारी

दुर्गम भागातील नागरिकांना साध्या कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये, या उदात्त हेतूने महाबळेश्वरचे तहसीलदार श्री. सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शासकीय सेवा विहित कालावधीत आणि थेट लोकांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामुळे महसूल विभागाशी संबंधित अनेक महिने रेंगाळलेली कामे जागेवरच निकाली काढण्यात आली.

प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची उपस्थिती:

या महत्वपूर्ण कार्यक्रमाला तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये: श्री. सचिन मस्के (तहसीलदार, महाबळेश्वर), श्री. विनोद सावंत (महसूल नायब तहसीलदार), श्री. साळुंके (उपअधीक्षक, भूमि अभिलेख),

श्री. मनोज पाटील (उपकृषी अधिकारी),प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या शिबिराला उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये पंचायत समिती सदस्य श्री. संजय मोरे, उचाटच्या सरपंच श्रीम. स्वाती ढेबे, सालोशीच्या सरपंच श्रीम. नंदा चव्हाण यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण:

महाबळेश्वर तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या लामज मंडलातील गावांना तालुक्याच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी मोठा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. मात्र, आजच्या शिबिरामुळे दाखले, सातबारा उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आणि इतर तांत्रिक कामे गावातच पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. “प्रशासनाने आमच्या दारी येऊन दिलेली ही सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे,” अशी भावना उचाट येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket