महाबळेश्वर तालुक्यात हॉटेलच्या बांधावरून पडून एकाचा मृत्यू; आकस्मात मृत्यूची नोंद
महाबळेश्वर, २९ जून २०२५: महाबळेश्वर तालुक्यातील एका हॉटेलच्या बांधावरून पडून दत्तात्रय सर्जेराव रांजणे (वय ५०, रा. कोलेवाडी, ता. जावळी, जि. सातारा) यांचा आकस्मात मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती हॉटेल मालक संजय महादेव उतेकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १९४ नुसार महाबळेश्वर पोलीस स्टेशनला दिली, ज्याची नोंद अ.म.रजि नं. २१/२०२५ अशी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय रांजणे हे त्यांच्यासोबत आलेले पर्यटक सुधीर उत्तम रांजणे (वय ३४), अमोल नामदेव नावासरे (वय ४७) आणि हनुमंत शंकर रांजणे (वय ६५) यांच्यासह २८ जून रोजी रात्री ११ वाजता “महाबळेश्वर ॲग्रो व्हिला” हॉटेलमधील रूम नंबर ०२ मध्ये मुक्कामासाठी आले होते. याच दरम्यान, हॉटेलसमोर असलेल्या बांधावरून पडून दत्तात्रय रांजणे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
