महाबळेश्वर वनक्षेत्रात फाउंटन हॉटेलचा पर्यावरण हल्ला सांडपाणी थेट जंगलात; व्यवस्थापकावर वनगुन्हा दाखल
महाबळेश्वर (प्रतिनिधी)जागतिक पर्यटन नकाशावर झळकणारे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वरचे हिरवेगार वनक्षेत्र आता सांडपाण्याच्या दुर्गंधीने त्रस्त झाले आहे. बॉबिंग्टन पॉईंट ते टायगर पाथ या संवेदनशील राईडवर थेट फाउंटन हॉटेलच्या एस.टी.पी. प्लांटमधून फुटलेल्या पाइपलाईनमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वनक्षेत्रात वाहू लागल्याने वनविभागाने मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी हॉटेल फाउंटनचे व्यवस्थापक आबिद मोहम्मद डांगे (वय ५२) यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वनगुन्हा क्रमांक 05/2025 नोंदविण्यात आला आहे. आरोपीने गुन्हा कबूल केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
वनविभागाच्या चौकशीत सांडपाणी साधारण 200 मीटरपर्यंत वनक्षेत्रात पसरण्याचे उघड झाले. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून वन्यप्राण्यांच्या अधिवासावर गंभीर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वनकायद्यानुसार अशा प्रकारे वनक्षेत्रात मैलापाणी किंवा सांडपाणी सोडणे हा गंभीर पर्यावरणीय गुन्हा असून त्यासाठी १ वर्षांपर्यंतचा कारावास किंवा पाच हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
“कोणत्याही नागरिकांच्या निदर्शनास अशा घटना आल्यास त्वरित वनविभागास कळवावे; माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल,” असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. तसेच महाबळेश्वर परिसरातील हॉटेल व रिसॉर्ट मालकांना कठोर इशारा देण्यात आला आहे की अशा कृत्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक लहू राऊत आणि वनमजूर पथकाने संयुक्तरित्या केली. पुढील तपास वनपाल सुनील लांडगे करत आहेत.
महाबळेश्वरसारख्या पर्यटन स्वर्गात आता वनक्षेत्रात सांडपाणी वाहू लागल्याने पर्यावरणप्रेमींत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.




