‘किसन वीर’ च्या साई केंद्रात यावर्षीही होणार उन्हाळी कुस्ती शिबीर
१ मेपर्यंत इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन
दि. १५/४/ २५: किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या साई (स्पोर्टस अँथॉरिटी ऑफ इंडिया) केंद्राच्यावतीने १ मे ते २५ मेअखेर उन्हाळी निवासी शिबीर ते १६ वयोगटातील कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आयोजित केले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली. दरम्यान, या शिबीरात सहभागी होणाऱ्या मुलांनी १ मे पर्यंत कारखान्याच्या कुस्ती केंद्रात नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
माहितीपत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी कारखान्याची सुत्रे हातात घेतल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊन बंद पडलेले उन्हाळी कुस्ती शिबीर पुन्हा सुरू केलेले होते. मागील दोन वर्षाचा मिळालेला प्रतिसाद पाहता याही वर्षीं उन्हाळी कुस्ती शिबीर घेण्याचा निर्णय नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने घेतलेला आहे. या उन्हाळी शिबीरात सहभागी होणाऱ्या शिबीरार्थीस सात हजार पाचशे रूपये फी आकारण्यात येणार आहे. या फीमध्ये शिबीरार्थीसाठी निवास, भोजन, दुध, नाष्टा, फलाहार देण्यात येणार असून टी शर्ट, शॉर्ट व शुज हे प्रशिक्षणांती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी दोन आंतरराष्ट्रीय मॅटसह कुस्ती क्षेत्रातील तज्ञ, शासकीय कुस्ती मार्गदर्शक दत्ता माने हे मार्गदर्शन करणार असून योगाचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी शिबीरार्थीना ट्रॉफीजचे वाटप करण्यात येणार आहे.
मर्यादित शंभर मुलांसाठी हे उन्हाळी शिबीर आयोजित केलेले असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. या उन्हाळी शिबीरामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी दैनंदिन वापरायच्या वस्तु बिछाना सोबत आणायचे असून अधिक माहितीसाठी कारखाना कुस्ती मार्गदर्शक राजेंद्र कणसे(९२७००७८५३४) यांच्याशी संपर्क साधावा आणि या उन्हाळी शिबीरचा लाभ घ्यावा, असे आवाहनही व्यवस्थापनाच्यावतीने व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
