कराड ओगलेवाडी येथे पकडलेल्या एमडी ड्रग्जच्या रॅकेटमध्ये दोघा संशयताना पोलिसांनी केली अटक
कराड प्रतिनिधी- मागील दीड महिन्यापूर्वी पोलिसांनी ओगलेवाडी येथे पकडलेल्या एमडी ड्रग्जच्या रॅकेटमध्ये बड्या घरातील दोघा संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. एकास काल रात्री तर दुसऱ्यास पहाटे पुण्याच्या विमानतळावरून अटक केली आहे.
गौरव संदीप राव व सुजल उमेश चंदवानी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. चंदवानीला पुण्याच्या विमानतळावरून अटक केली. तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला गती येणार आहे, ड्रग्ज प्रकरणात अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यापूर्वी कराड शहर व परिसरामध्येही पोलिसांनी ओगलेवाडी येथे छापा टाकून (एमडी) ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना अटक केली होती. त्याचे धागेदोरे सुरुवातीला मुंबई त्यानंतर परदेशापर्यंत पोहचले होते. या प्रकरणी पोलिस तपास सुरु होता. यापूर्वी अटक केलेल्या संशयितांबरोबर चंदवानी व राव याचे कॉल रेकॉडींग पोलिसांना मिळून आले आहे. फोन कॉलमधून काही धक्कादायक माहिती पोलिसांना समजली होती. या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याने चंदवानी व राव हे दोघे पोलिसांना हवे होते. पोलिस चंदवानी याला ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर तो फरार झाला होता. तर राव याला पोलिसांनी गजानन हौसिंग सोसायटी येथून अटक केली.त्यानंतर पोलिसांची तीन पथके चंदवानीच्या मागावर होती. चंदवानीने दोन वेळा पुण्यातच पोलिसांना गुंगारा दिला होता. काल रात्रीपासून त्याच्या मागावर पथक होते. तो परदेशी पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांची होती. त्यामुळे पोलिस त्याच्या हालचालीवर वॉच ठेवून होते. त्याला पहाटेच पुण्याच्या विमानतळावरून अटक करण्यात आली.
शांत आणि सांस्कृतिकरित्या पुढारलेले शहर असणाऱ्या कराडमध्ये ड्रग्स प्रकरणाने जिल्ह्यामधील वातावरण चांगलेच तापले आहे. सातारा जिल्ह्यामधील ड्रग्स, जुगार दारू धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे.
