कास पठारावर दुर्मिळ वनस्पती लागवड व संवर्धन उपक्रम उत्साहात
सातारा -जागतिक नैसर्गिक वारसास्थळ कास पठार येथे दुर्मिळ वनस्पती संवर्धन प्रकल्पांतर्गत विशेष वनस्पती लागवड व संवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक मा. श्री. सुनील लिमये यांच्या हस्ते करण्यात आले.
सातारा वन विभाग, ‘प्रकृती फेलोशिप’ आणि ‘रानवा’ संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दुर्मिळ व स्थानिक वनस्पतींच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डॉ. अंकुर पटवर्धन यांनी कास पठाराच्या जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिक प्रजातींचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते काळी निसुर्डी (Adelocaryum malabaricum) व हिरवी निसुर्डी (Adelocaryum lambertianum) या दुर्मिळ एकुण 100 वनस्पतींची लागवड करण्यात येवुन मानद वन्यजीव रक्षक सातारा श्री. सुनील भोईटे यांनी कास पठारासारख्या जागतिक स्तरावर महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रात दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगून अशा उपक्रमात स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे कास पठारावरील स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, दुर्मिळ वनस्पतींचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक वारसा जतन करण्यास मोठी चालना मिळणार असल्याचे मत उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते यांनी केले. सदर कार्यक्रमास सहाय्यक वनसंरक्षक (वनी.) श्री. प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी मेढा (प्रा.) श्री. संतोष पाटील तसेच श्री. प्रकाश शिंदे वनपाल रोहोट, श्रीम. उज्जवला थोरात वनपाल बामणोली , वनरक्षक समाधान वाघमोडे, जयंत निकम, तुषार लगड, व संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, कास, एकिव, आटाळी, कासाणी, पाटेघर, कुसूंबी, ग्रामस्थ तसेच पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





