जगभरातल्या शेअर बाजार मध्ये मोठी घसरण होण्याची भविष्यवाणी
जगभरातील बाजारपेठांमध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. यामध्ये भारतीय शेअर बाजारालाही या अस्थिरतेचा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार युद्ध सुरू झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जागतिक बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक गंभीर इशारा दिला आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते, सध्या शेअर बाजारात मोठा फुगा तयार झाला असून तो फुटण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी भाकीत केले आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेला एका प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे 1929 च्या महामंदीचाही विक्रम मोडला जाऊ शकतो.
कियोसाकी यांनी त्यांच्या X (माजी ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हणले आहे की, “सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक बाजारात मोठी उलथापालथ होत आहे. अमेरिका, जर्मनी आणि जपानसारख्या देशांमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे ही स्थिती आणखी गंभीर बनली आहे.” त्यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे की, ही मंदी 1929 च्या आर्थिक घसरणीपेक्षाही मोठी आणि विध्वंसक ठरू शकते.
कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना बाजारातील अस्थिरतेमुळे घाबरून जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील सांगितले आहे की गुंतवणूकदारांनी कोणत्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करावी. यामध्ये त्यांनी, या काळात गुंतवणूकदारांनी पारंपरिक शेअर्सऐवजी अधिक सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर द्यावा. त्यांनी मुख्यतः सोने, चांदी, बिटकॉइन आणि स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) यामध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे.दरम्यान, जागतिक बाजारात सुरू असलेली ही अस्थिरता पुढील काही महिन्यांत आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईघाईत कोणतेही निर्णय न घेता काळजीपूर्वक विचार करावा. तसेच, आर्थिक संकटे ही संकट नसून योग्य नियोजन असल्यास ती सुवर्णसंधी ठरू शकतात, असे कियोसाकी यांनी म्हणले आहे.
