जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य: वाई तालुक्यातील ‘जांब’ येथे आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेच्या शाखेचे उद्घाटन
सातारा:जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था (महाराष्ट्र राज्य) शाखा वाई यांच्या अंतर्गत जांब (ता. वाई) येथील आदिवासी पाड्यावर नवीन शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अविनाश ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
‘हर हर महादेव’ आणि ‘जय आदिवासी, जय जोहार’च्या घोषात सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडला. या प्रसंगी संस्थेचे जिल्हाध्यक्ष सदाशिव रुईघरे, तालुकाध्यक्ष संपत सूर्यवंशी, बापू झाडे, शाम पवार आणि जांब येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष सदाशिव रुईघरे यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व विशद केले. आदिवासी कोळी महादेव समाजाच्या समृद्ध रूढी व परंपरा जपण्याचे आवाहन त्यांनी केले. “आगामी काळात संघटना जांब येथील आदिवासी पाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. सर्व शासकीय योजनांचा लाभ घटनात्मक व वैधानिक मार्गाने गरजूंपर्यंत पोहोचवणे आणि ‘गाव तिथे शाखा’ या संकल्पनेनुसार संघटनेचा विस्तार करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे,” असा विश्वास रुईघरे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशाबद्दल जांब आदिवासी पाड्याचे अध्यक्ष उत्तमराव कदम, सचिव किरण कदम, कार्याध्यक्ष अविनाश दरेकर आणि सहसचिव अजित बेस्के यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांचे आभार मानले.





