महाबळेश्वर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
महाबळेश्वर :पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर शहरात सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद हद्दीत दररोज सुमारे सात ते आठ टन घनकचरा निर्माण होत असताना, त्याचे योग्य वर्गीकरण व वेळेवर वाहतूक करण्यात मोठी कुचराई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच स्वच्छता समिती सभापती यांच्या देखरेखीखाली हा कारभार होत असला तरी, घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ठेकेदाराच्या गलथान कामकाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
महाबळेश्वर बाजारपेठेसह विविध प्रमुख रस्त्यांवर दोन-दोन दिवस कचरा न उचलल्याने दुर्गंधी व अस्वच्छता वाढली आहे. बाजारपेठेत काही प्रमाणात झाडलोट होत असली तरी शहरातील सोसायट्या, मोहल्ले आणि अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचलेले दिसतात.
विशेष म्हणजे, बस डेपो परिसरात तर कचऱ्याचे ढिग पाहता जणू काही अधिकृत कचरा डेपोच उभारण्यात आला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कोट्यवधींचे बक्षीस मिळवणाऱ्या महाबळेश्वर नगरपरिषदेला सध्या या ढिसाळ कारभारामुळे बदनामीला सामोरे जावे लागत आहे. लाडक्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पालिकेची प्रतिमा मलिन होत असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.




