वन्यप्राण्यांवर विषप्रयोग प्रकरणाची सखोल चौकशी – वनमंत्री गणेश नाईक
भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सतर्कता वाढविणार
मुंबई- अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागाच्या चौराकुंड वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांना विषप्रयोग करून ठार मारल्याच्या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी याविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य बच्चू कडू, भाई जगताप, सुनील शिंदे, संजय खोडके, मनिषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
वनमंत्री नाईक म्हणाले, वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागामार्फत आवश्यक कार्यवाही व उपाययोजना केल्या जात आहेत. मानवी वावरास सक्त मनाई असलेल्या भागांमध्ये मानवाचा वावर शोधण्यासाठी सॅटेलाईटच्या माध्यमातून देखरेख, वनरक्षकांचे गस्त पथक आणि स्थानिक नागरिकांशी सुसंवाद वाढवून माहिती संकलित करण्यावर भर दिला जात आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चौराकुंड वनक्षेत्रात २२ व २३ मे २०२६ रोजी विषप्रयोगामुळे खवले मांजर, भेकर, माकड आदी वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. काही प्राण्यांचे अवयव कुजल्याने तपासात अडचणी आल्या. वनक्षेत्र संचालकांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले असून आरोपींना अटक केली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याने विषप्रयोग केल्याची कबुली दिल्यानंतर आणखी चार जणांचा सहभाग असल्याचेही सांगितले आहे. विषप्रयोग झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असून सविस्तर अहवाल अद्याप येणे बाकी आहे. हा अहवाल प्राप्त होताच संबंधितावर कडक कारवाई केली जाईल.
वनमंत्री नाईक यांनी वाघ व बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचे सांगितले. भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अभयारण्ये, सफारी प्रकल्प आणि वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक भक्ष्य उपलब्ध करण्यावर राज्य सरकार भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वनमंत्री नाईक म्हणाले, वन विभागाची कार्यपद्धती अधिक लोकाभिमुख करण्याबरोबरच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी राज्यभर अभयारण्ये, बिबट सफारी आणि विदर्भात व्याघ्र प्रकल्प विकसित करण्याचा विचार सुरू करण्यात येणार असून वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक भक्ष्याची उपलब्धता वाढवून त्यांना गाव व शेतांकडे येण्यापासून परावृत्त करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.




