मान्सूनपूर्व तयारीसाठी राज्य शासन सज्ज; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई : राज्यातील संभाव्य मान्सून परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडून आयोजित मान्सूनपूर्व तयारीबाबतची महत्त्वपूर्ण बैठक मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंत्री मकरंदआबा पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अतिवृष्टी, पूर, दरडी कोसळणे यांसारख्या संभाव्य आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विविध विभागांतील समन्वय तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी मागील वर्षी उद्भवलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीत प्रशासनातील सर्व विभागांनी केलेल्या तत्पर कार्यवाहीची माहितीही बैठकीत देण्यात आली. तसेच यावर्षी देखील सर्व संबंधित यंत्रणा अधिक संवेदनशीलता आणि समर्पण भावनेने कार्य करतील, असा विश्वास मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
“नागरिकांची सुरक्षा आणि तत्पर प्रशासन हेच शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन सज्ज राहील,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




