हिंदवीयन्संनी जपली सामाजिक बांधिलकी
गुरुकुलचा अभिनव उपक्रम; कागदी पिशव्यांचे बाजारपेठेत वाटप
सातारा, ता. ९ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंदवी पब्लिक स्कूल यांच्या पंचकोशाधारित गुरुकुलच्या वतीने ‘निसर्गासाठी एक दिवस’ हा पर्यावरण जागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पाचवी ते सातवीच्या वर्गातील एकूण ७० विद्यार्थ्यांनी सुमारे ७०० कागदी पिशव्या स्वतः बनवल्या आणि त्या शहरातील बाजारपेठांमध्ये, घरोघरी जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी प्लॅस्टिकचा पर्याय म्हणून कागदी पिशव्यांचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांचा हा उपक्रम नागरिकांत पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला.
या उपक्रमाच्या तयारीसाठी हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, गुरुकुल प्रमुख संदीप जाधव व राहुल रावण यांनी मार्गदर्शन केले. हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुल ही एक १२ तासांची शाळा असून, इथे शैक्षणिक अभ्यासाबरोबरच योगासने, प्राणायाम, कलागुण, संगीत, चित्रकला, मैदानी खेळ इत्यादींवर भर दिला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो.
या कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी सागर मित्र अभियानाचे प्रतिनिधी सोहम कुलकर्णी, धनवी जोशी आणि आदिती जोशी उपस्थित होते. अमित कुलकर्णी यांनी सांगितले, ‘प्लॅस्टिक ही जागतिक समस्या आहे. पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती हाच यावर उपाय आहे.’ या वेळी धनवी यांनी विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. ‘निसर्गासाठी एक दिवस’ या अभिनव उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी केवळ पर्यावरणाचे महत्त्व समजले नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकीही जपली. कार्यक्रमास मुख्याध्यापिका ज्योती काटकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, तसेच प्रसाद जोशी, हेमलता जगताप, निर्मला साळुंखे आणि इतर हिंदवियन्स उपस्थित होते. इयत्ता सातवीच्या अर्चिस कुलकर्णीने सूत्रसंचालन केले. शार्दूल कांबळेने आभार मानले.
