Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बाजारपेठेत हातगाडे, वाहने आणि गर्दीचा कहर; महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा संताप

बाजारपेठेत हातगाडे, वाहने आणि गर्दीचा कहर; महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा संताप

बाजारपेठेत हातगाडे, वाहने आणि गर्दीचा कहर; महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा संताप

महाबळेश्वर (प्रतिनिधी ) राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये मे हंगामाची सुरुवात होत असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो पर्यटक थंड हवामान, निसर्गरम्य वातावरण आणि बाजारपेठेतील खरेदीचा आनंद लुटण्यासाठी येथे दाखल होत आहेत. पर्यटक महाबळेश्वरच्या बाजारपेठेत निवांत खरेदी व अल्लादायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी येतात; मात्र आडवे-तिडवे अतिक्रमण, अव्यवस्थित हातगाडे आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्यांचा अनुभव कडू होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ऐन गर्दीच्या वेळेत (सुमारे रात्री ८.३० वाजता) बाजारपेठेत प्रचंड गजबज असताना एका बाजूला मक्याचे कणीस विक्रेत्याचा हातगाडा, दुसऱ्या बाजूला आइसक्रीमचा गाडा आणि मधोमध पोलिसांचे वाहन उभे राहिल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाल्याचे पाहायला मिळाले. पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या पर्यटकांना अक्षरशः गर्दीतून वाट काढत चालावे लागत होते. काही ठिकाणी तर ग्राहकांना दुकाने गाठणेही कठीण झाले होते. परिणामी, खरेदीचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक त्रस्त होत असून अनेकजण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

अशा प्रकारच्या अतिक्रमणामुळे केवळ वाहतूक कोंडीच होत नाही, तर अपघाताचा धोका देखील वाढत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर सेवा वेळेत पोहोचू शकतील का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, याबाबत स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांकडून वारंवार तक्रारी करूनही पोलिस व नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

मे हंगामाच्या पार्श्वभूमीवर शहरात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढणार असताना, अशा बेजबाबदार व्यवस्थेमुळे महाबळेश्वरच्या पर्यटन प्रतिमेला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहराची ओळख असलेल्या स्वच्छ, सुटसुटीत आणि पर्यटक-मैत्रीपूर्ण बाजारपेठेऐवजी अव्यवस्थित व गर्दीने ग्रासलेले चित्र समोर येत आहे.नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यावर तातडीने दखल घेणार का?

रस्त्यावरचे अतिक्रमण हटवणे, हातगाड्यांसाठी नियोजित जागा निश्चित करणे, वाहतूक व्यवस्थापन कडक करणे आणि पर्यटकांना सुरक्षित, मोकळा व आनंददायी अनुभव देणे अत्यावश्यक बनले आहे. अन्यथा, महाबळेश्वरची प्रतिमा मलिन होण्याचा धोका निर्माण होणार असल्याची जोरदार प्रतिक्रिया नागरिक, व्यापारी व पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket