उंडाळे परिसराला गारांसह जोरदार पावसाचा तडाखा; गुढीपाडव्यादिवशी अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान
कराड (प्रतिनिधी) : राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरच दुपारच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कराड शहरासह उंडाळे, काले, नांदगाव, शेवाळेवाडी या परिसरात ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि गारांसह मुसळधार पाऊस झाला.
या अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेल्या शाळू पिकांसह गहू आणि आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे पिकांची नासधूस झाली असून शेतकरी हतबल झाले आहेत.
अचानक बदललेल्या हवामानामुळे शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून शासनाकडून तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.




