तांबवेत आण्णा बाळा पाटील यांच्या स्मृतीदिनी अभिवादन
तांबवे ः स्वातंत्र्य सैनिक (कै) आण्णा बाळा पाटील यांचा स्मृतिदीन येथील स्वा.सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयात झाला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
गावचे माजी सरपंच संतोष कुंभार, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निवासराव पाटील यांच्या हस्ते (कै) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील, निलेश भोसले, शंकर पाटील, मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. निवासराव पाटील म्हणाले, आण्णा बाळा पाटील उर्फ भाऊ यांनी स्वातंत्र्यसंग्रामाच्या चळवळीमध्ये आपल्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन भूमिगत चळवळ चालू ठेवली, म्हणून आजही तांबवे गावाला स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी असे म्हटले जाते. त्यांनी गावचे पहिले सरपंच म्हणून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. लोकांच्यामध्ये एकोपा राहण्यासाठी गावातील वादविवाद गावातच मिटवुन गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणण्यासाठी गावात पहिली सहकारी तत्त्वावर पाणीपुरवठा संस्था स्थापन केली. गावाच्य विकासासाठी तांबवे ग्रामपंचायत, विकास सोसायटी, विद्यालय, सुपर मार्केट या संस्थांच्या इमारती उभा करण्याचे काम भाऊंनी त्यांच्या काळात सहकाऱ्यांच्या मदतीने केले. येणाऱ्या काळामध्ये गावातील अनेक विकासाची कामे करून भाऊंच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम करूया, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. उपशिक्षक पी. टी. पवार यांनी आभार मानले.
