गोव्यात जागतिक एमएसएमई दिन उत्साहात साजरा
पणजी, २७ जून २०२५: गोवा सरकारच्या उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालयाच्या वतीने जागतिक एमएसएमई दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पणजी येथे पार पडला. राज्यभरातून आलेल्या उद्योजक, विद्यार्थी, उद्योगतज्ज्ञ आणि महिला स्वयंसहायता गटांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘The Iris Peridot MSME TV App’ चे उद्घाटन करण्यात आले. या व्हिडिओ आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एमएसएमई क्षेत्रातील नवउद्योजकांना शिकण्याची आणि मार्गदर्शन मिळवण्याची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे.
यावेळी रॅम्प कार्यक्रमाअंतर्गत महिला स्वयं सहायता गटांना औपचारिक उद्योगात रूपांतरित करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्योग नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच EDII आणि सेंट जोअन्स संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, जगातील ९०% उद्योग एमएसएमई क्षेत्रात आहेत. हे क्षेत्र जागतिक जीडीपीमध्ये ५०% योगदान देत असून, ७०% रोजगारही या क्षेत्रातून निर्माण होतो. गोव्यात आतापर्यंत ७०,००० हून अधिक एमएसएमई उद्योग नोंदणीकृत झाले असून, यामुळे २१ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय निर्माण झाला आहे.
ते पुढे म्हणाले, आज येथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी किमान ५०% जण उद्योजक बनतील, असा माझा आत्मविश्वास आहे. आपल्याला सेवा क्षेत्रावर आधारित स्टार्टअप्सची नितांत गरज आहे, विशेषतः पर्यटन आणि आयटी क्षेत्रात. सध्या गोव्यात ६२४ आयटी स्टार्टअप्स आहेत, त्यापैकी ५०% महिला उद्योजकांच्या नेतृत्वात आहेत, ही गोव्यासाठी अभिमानाची बाब आहे.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि डिजिटल इंडिया या दूरदृष्टीचा उल्लेख करत म्हटले, योजना, धोरणे आणि सवलती यापलीकडे जाऊन, आपण उद्योजकांच्या स्वप्नांना दिशा देत आहोत. हा दिवस गोव्याच्या उद्योजकतेला आणि ग्रामीण भागातल्या स्वप्नांना दिलासा देणारा ठरला आहे. जिथे सरकार, उद्योग क्षेत्र आणि समाज एकत्र येऊन उद्योजकतेची नवी दिशा आखत आहेत.
या कार्यक्रमाला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, सचिव सुनील अंचीपका, संचालक अश्विन चंद्रू, जीसीसीआयच्या प्रतिमा ढोंड, माजी अध्यक्ष मंगुरिश पाई रायकर, परिवहन संचालक आणि जीआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक हे उपस्थित होते.
