सुवर्णमयी आवाजाच्या आकाशवाणीतील ज्येष्ठ उद्घोषिका सोनाली बंड सेवानिवृत्त
आकाशवाणीतील मखमली आवाजाचा प्रवास पूर्ण
सातारा : गोल्डन व्हॉईस म्हणून श्रोत्यांच्या मनात घर केलेल्या ज्येष्ठ उद्घोषिका सौ. सोनाली बंड यांच्या आकाशवाणी सेवेला नुकताच भावनिक निरोप देण्यात आला. गोड, मखमली आणि ओजस्वी आवाजाची ओळख असलेल्या या उद्घोषिकेने तब्बल साडेतीन दशकांचा काळ श्रोत्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपले. १९८९ साली आकाशवाणी सांगली केंद्रावर हंगामी उद्घोषिका म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. केवळ दोन वर्षातच परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी कायस्वरुपी उद्घोषिका म्हणून आकाशवाणी सातारा केंद्रावर रुजू होण्याचा मान मिळविला. सातारा केंद्राच्या स्थापनेपासून त्या साक्षीदार राहिल्या.
सुरुवातीच्या काळात सातारा छोटे केंद्र होते. सुविधा मर्यादित होत्या आणि तंत्रज्ञान अद्ययावत नव्हते. तरीही विविध अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत प्रत्येक आव्हानाला त्या सामोरे गेल्या. निवडणूक निकाल, लोकसंगीताचा विशेष कार्यक्रम, सज्जन गड उत्सव आणि पुसेगाव रथयात्रां थेट प्रसारण असे आव्हानात्मक कार्यक्रम त्यांनी समर्थपणे हाताळले. विविधभारती नंतर भारतातील पहिला लाईव्ह हॅलो हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय झाला. त्यांच्या या अविस्मरणीय कामगिरीमुळे त्या श्रोत्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरल्या. त्या काळातील धावपळ, ताण आणि जबाबदारी आजही त्यांच्या आठवणीत ताजी आहे. अनेक अनुभवी तसेच ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. यामध्ये श्री. सुभाष तपासे, श्री. सतीश साने, श्री. अरुण सोळंकी, बीणा जोशी, अरुणा रानडे, शुभदा अभ्यंकर, श्री. सचिन प्रभुणे यांचा समावेश आहे.
महिला, बाल आणि सामाजिक विषयांवरील असंख्य कार्यक्रमांमधून त्यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’, हा ध्यास जपला. ‘ज्ञान, माहिती आणि मनोरंजन’ या आकाशवाणीच्या ध्येयवाक्याला न्याय देत त्यांनी श्रोत्यांशी भावनिक नाते निर्माण केले. त्यांचा आवाज अनेक घरातील सकाळ-संध्याकाळचा अविभाज्य भाग बनला होता. उद्धघोषक हे क्षेत्र दुर्मीळ आणि अत्यंत जबाबदारीचे मानले जाते. सतत सजग राहणे, अचूक उच्चार, वेळेचे भान आणि प्रसंगावधान या गुणांची कसोटी लागते. या सर्व कसोट्यांवर त्या नेहमीच उतरल्या.
निरोप समारंभात सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यनिष्ठा, साधेपणा आणि मार्गदर्शक वृत्तीचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या. सुविधा कमी होत्या, पण जिद्द आणि टीमवर्क मोठे होते’, ‘हा प्रवास केवळ माझा नव्हता; तो सर्व सहकारी, अधिकारी आणि श्रोत्यांचा होता. मी सर्वांची ऋणी आहे. ‘त्यांच्या निवृत्तीने आकाशवाणीच्या इतिहासातील एक सुवर्णपान पूर्ण झाले असून हा ‘गोल्डन व्हॉईस’ मात्र कायम मनात राहील.




