महाबळेश्वरमध्ये ‘गडकोट’ भक्तीचा जागर! न.पा. मुख्याधिकारी योगेशजी पाटील यांच्या सहकार्याने नाट्य शिव प्रतिष्ठानच्या किल्ले स्पर्धेला बालकांचा प्रचंड प्रतिसाद!
महाबळेश्वर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा महान वारसा जतन करण्याच्या उद्देशाने महाबळेश्वर शहरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या मंगलमय पर्वावर ‘किल्ले स्पर्धा’ अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. “छत्रपती शिवरायांचे अभेद्य आणि ऐतिहासिक गडकोट किल्ले म्हणजे आपल्या सर्वांची पवित्र मंदिरेच,” ही उच्च भावना घेऊन आयोजित या स्तुत्य स्पर्धेला बालगोपाळ आणि शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे व प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
मुख्याधिकारी योगेशजी पाटील यांचे मोलाचे सहकार्य
या ‘गडकोट’ भक्तीच्या जागीरला महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. योगेशजी पाटील साहेब यांनी मोठे पाठबळ दिले आहे. नाट्य शिव प्रतिष्ठान संस्थेद्वारे आयोजित या स्पर्धेसाठी, पाटील साहेबांनी कोणत्याही अटीशिवाय तत्परतेने नगरपालिकेचे पेटीट लायब्ररीचे मैदान तसेच दगड, माती साहित्यासह सर्व आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले. मुख्याधिकारी साहेबांच्या या अमूल्य सहकार्यामुळे नाट्य शिव प्रतिष्ठान संस्थेच्या किल्ले स्पर्धा निश्चितच यशस्वी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
गौरवशाली इतिहास आणि दुर्गबांधणी कलेची ओळख
शिवकालीन गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याच्या या स्पर्धेतून लहान मुलांना आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि दुर्गबांधणीच्या अद्वितीय कलेची माहिती मिळते. छत्रपती शिवराय हे लोककल्याणकारी राजा कसा असावा, याचा आदर्श आहेत. स्वतःच्या प्रजेला आपल्या प्रेरणास्थानी ठेवून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा आचार-विचार राखत, त्यांनी या भारतभूमीला एकसंघ आणि स्वाभिमानी ठेवण्यासाठी, राष्ट्रहित जोपासण्यासाठी आणि देव, देश, धर्म रक्षणासाठी लढा दिला. त्यांचा हा आदर्शवाद, हा धडा नव्या पिढीला मिळावा आणि नवी पिढी अशा विचारांनी जागृत व्हावी, यासाठीच अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते.
नाट्य शिव प्रतिष्ठान संस्थेने या स्तुत्य उपक्रमासाठी आणि अमूल्य सहकार्याबद्दल मा. योगेशजी पाटील साहेब आणि महाबळेश्वर नगरपालिकेचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार मानले आहेत.




