सातारा शहरात पथविक्रेत्यांच्या लोक कल्याण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा-पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पथविक्रेते व लघु व्यावसायिक लाभार्थ्यांसाठी सातारा नगर परिषदेच्या वतीने लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा दि. ३० जून रोजी सोनचिरैया कार्यालय, पहिला मजला, राजवाडा ऑफिस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करणारे पथविक्रेते तसेच स्वनिधी योजनेअंतर्गत ११५,०००, १२५,००० व ₹५०,००० पर्यंतचे कर्ज लाभ घेतलेले अनेक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी व व्यवसायवृद्धीच्या संधी जाणून घेण्यासाठी लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्याची सुरुवात नगराध्यक्ष मा.अमोल मोहिते, नियोजन सभापती मा. अशोक शेडगे, महिला बालकल्याण समिती सभापती मोनिका घोरपडे, उपसभापती सुजाता गिरी गोसावी व नगरसेविका दिनाज शेख, नगरसेविका हेमलता भोसले, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक श्री. राम तांदळे, शहर पथविक्रेता अध्यक्ष संजय पवार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
सातारा शहरात आजपर्यंत एकूण ५५८४ पथविक्रेत्यांना या योजनेचा फायदा मिळाला असून एकूण ८ कोटी ९९ लाख इतके कर्ज वाटप केले आहे. कर्जधारक त्याची व्यवस्थित कर्ज परतफेड करत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. सर्व शासकीय योजनाची संबंधितांपर्यंत माहिती देण्यासाठी व फायदा देण्यासाठी ज्याप्रमाणे नगरपरिषद प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे पथविक्रेत्यांनी सुद्धा स्वयं कर्तव्याचे व शिस्तीचे पालन करून स्वतःचा त्याचबरोबर शहराचा विकास करावा असे सांगितले. सर्व लाभार्थ्यांनी पुढील टप्प्याचे कर्ज घेऊन डिजिटल प्रक्रियेचा जास्तीत जास्त वापर करावा व क्रेडिट कार्डचा सुद्धा वापर करून स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करावा असे आवाहन करून नगराध्यक्ष मा. अमोल मोहिते, यांनी सर्व उपस्थितांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक श्री. राम तांदळे यांनी उपस्थित पथविक्रेत्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजना व मुद्रा योजनेची सविस्तर माहिती दिली. या योजनांमधून कर्ज कसे मिळवावे, त्याचा व्यवसाय वाढीसाठी कसा फायदा होऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन केले,महिला बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे व नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी पथविक्रेत्यांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा फायदा घेऊन आत्मनिर्भर होण्याविषयी आवाहन केले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विनोद जळक व उपाध्यक्ष अॅड. श्री. डी. जी. बनकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या योजनेचा तिसरा टप्पा म्हणजेच रुपये ५०,०००/- पूर्णपणे परतफेड करणाऱ्या ५ लाभार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक गीतांजली यादव, सूत्रसंचालन व्यवस्थापक कीर्ती साळुंखे, आभार प्रदर्शन समुदाय संघटक आरती जोशी यांनी केले तर सेजल साळुंखे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमास जिल्हा समन्वयक राजेंद्र दिवेकर, पाचगणी नगर परिषदेचे माधवी जगदाळे, महाबळेश्वर नगर परिषदेचे संतोष धड, मलकापूर नगर परिषदेच्या शाहीन मनेर, म्हसवड नगर परिषदेच्या अनिता करंडे उपस्थित होत्या. राजधानी सातारा शहर संघाच्या अध्यक्ष आशा मुळीक, सचिव सुवर्णा कडकोळ, तर शहरातील विविध भागातील वस्तीस्तर संघाच्या सीआरपी तथा अध्यक्ष रूपाली गाढवे, योगिता कुन्हाडे, उषा कुडाळकर, प्रणिती शिंदे, अर्चना जाधव, स्वाती इंगवले, कल्याणी ढोणे, स्वप्नाली खंदारे, अश्फरा बागवान, रजिया शेख, मंगल गायकवाड, राजश्री जाधव, वैशाली मुसळे, वंदना डांगे, सोनचिरैया केंद्राच्या व्यवस्थापक अश्विनी निकम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले.





