प्रतिकूल परिस्थितीतही खेड्यातील विद्यार्थ्यांकडे शिकण्याची जिद्द- डॉ. प्रेरणा उबाळे
नागेवाडी-कुशी येथे विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमंगल हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
सातारा, दि. 1( प्रतिनिधी):-“प्रतिकूल परिस्थितीतही शिकण्याची जिद्द तुमच्यामध्ये दिसते. शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा येथील विज्ञान प्रदर्शन अधिक सरस वाटले,” असे प्रतिपादन डॉ. प्रेरणा उबाळे यांनी केले. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी-कुशी (ता. जि. सातारा) येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विज्ञान प्रदर्शन (शैक्षणिक वर्ष 2025-26) प्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ. प्रेरणा उबाळे पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मर्यादित साधनसामग्रीतून तयार केलेली उपकरणे त्यांच्या जिद्दीचे प्रतीक आहेत. खेड्यातील मुलीही जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतात, यासाठी आत्मविश्वास व मेहनत आवश्यक आहे. “आपण जशी स्वप्ने पाहतो, तशीच मेहनत घेतल्यास ती नक्की साकार होतात,” असे त्यांनी सांगितले. हिंदी ही जगातील चौथ्या क्रमांकाची भाषा असून 270 विद्यापीठांमध्ये ती शिकवली जाते, तसेच अमेरिकेत पाचवीपासून हिंदीचे शिक्षण दिले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वतःच्या भाषेचा आदर केल्यासच संधी निर्माण होतात, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करावे, तसेच संस्थेच्या विविध शाळांमध्ये पुढील काळात कार्यशाळा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस होते. ते म्हणाले की, डॉ. उबाळे यांनी वसंत आबाजी डहाके यांच्या मराठी कवितांचा हिंदी अनुवाद करून साहित्य अकादमी पुरस्कार मिळविला आहे, ही अभिमानाची बाब आहे. “स्वतःच्या कर्तृत्वावर करिअर घडवावे. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यास कमीपणा बाळगू नये,” असे ते म्हणाले. हिंदी व इंग्रजी या भाषा रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून त्या जागतिक स्तरावर उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव सौ. शिल्पा चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत जमदाडे, शिक्षक शशिकांत जाधव, नितीनकुमार कसबे, गुलाब पठाण, बाळकृष्ण इंगळे, हणमंत खुडे, राहुल घोडके, दिलीप सावंत, रमेश महामुलकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रेरणा उबाळे यांनी हिंदी विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा हिंदी भाषेतून घेतली. विद्यार्थ्याना वर्षभर शाळेत येऊन हिंदी भाषेतून बोलणे,लिहिणे यासाठी मी अभिनव प्रोजेक्ट करणार असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना आई-वडिलांचे कष्ट समजून घेऊन मनाने कष्टपूर्वक अभ्यास करण्याचे आवाहन करून त्यांची स्वप्ने पूर्ण करावीत असे सांगितले . तसेच त्यांच्या ‘मन ओथंबून जाते’ काव्यसंग्रहा मधील मन ओथंबून जाते’ ही कविता रमेश महामुलकर, श्रीनाथ सावंत व अथर्व चव्हाण यांनी ‘ तबला पेटीच्या तालावर सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शशिकांत जमदाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शशिकांत जाधव यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




