डी.एम.बावळेकर-महाबळेश्वर नगराध्यक्षपदासाठी प्रथम पसंती
महाबळेश्वर (अली मुजावर) :थंड हवेसाठी, निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि पर्यटनासाठी जागतिक दर्जाचे ओळखले जाणारे महाबळेश्वर हे शहर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या गजबजले आहे. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी सर्वांना एकत्र घेऊन मोट बांधून नगराध्यक्षपदासाठी दावेदारी सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. महाबळेश्वरच्या जनतेमध्ये डी एम बावळेकर यांच्या नावाला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या इतिहासात बावळेकर यांच्या कारकिर्दीचा ठसा ठळकपणे उमटलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून त्यांनी महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासाचा डोंगर उभा केला, असे मानले जाते.
शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पर्यटन सुविधा, तसेच महाबळेश्वरच्या सौंदर्यवर्धनाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांच्या कार्यकाळात राबवली गेली.बावळेकर हे अनुभवी, संपर्कसंपन्न आणि जनाधार असलेले नेते मानले जातात. त्यांनी सर्व आजी-माजी नगरसेवक, स्थानिक नेते, तसेच तरुण कार्यकर्त्यांना एकत्र आणून निवडणूक लढविण्याची मोहीम सुरू केली आहे.
यामुळे महाबळेश्वर नगरपालिकेतील आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील विविध सामाजिक, व्यावसायिक संघटनांचा त्यांना पाठिंबा मिळू लागला असून, “महाबळेश्वरचा विकास हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे”, असा त्यांचा ठाम दावा आहे.
आगामी काही दिवसांत बावळेकर समर्थकांकडून प्रचाराचे नियोजन, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि स्थानिक एकजुटीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.




