देऊर महाविद्यालयात राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना व संविधान गौरव दिन साजरा
भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान असून संविधान शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानात आपल्याला लोकशाहीबरोबरच न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही महान तत्वे दिलेली आहेत. भारतीय संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करून देशाला राष्टीय एकात्मतेने जोडून तेथील नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दूरशिक्षण विभाग साताराचे समन्वयक डॉ.सुर्यकांत गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रा.पांडुरंग पाटील यांनी केले.
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सदभावना व संविधान गौरव दिवसाच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की भारतीय संविधान आणि राज्यघटनेने आपल्याला समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क तसेच सांविधानिक परिहाराचा हक्क असे हक्क दिलेले आहेत. त्याबरोबरच आपण काही कर्तव्याचे पालन करण्याचे आदेशही दिलेले आहेत. त्यामुळे आपण संविधानाचा आदर करून संविधान घराघरात पोहचविण्यासाठी कार्यरत असले पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. शिवाजी चवरे म्हणाले की भारतीय संविधानात सरनामा, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, मूलभूत अधिकार असून आपण प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून राज्यघटनेत असणाऱ्या बाबींचे अवलोकन केले पाहिजे. तीन वर्षाच्या मंथनातून जगाला आदर्श ठरणारी आपली राज्यघटना आहे. त्याचबरोबर संविधानाच्या सर्वसमावेशकतेमुळे ती आजही काळाच्या कसोटीवर टिकून आहे.
सदर कार्यक्रमात संविधान जनजागर मंचच्या वतीने पाचव्या राज्यस्तरीय संविधान जागर परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. संजय कर्पे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील एन. सी. सी. कॅडेट कु.आरजू इनामदार हिने भारतीय राज्यघटनेचा सरनाम्याचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर ‘संविधान गौरव दिनाची’ रॅली देऊर गावामध्ये काढून संविधानाबाबन जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन राष्ट्रीय छात्र सेना, समान संधी केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, राज्यशास्त्र विभाग आणि सचेतना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख डॉ.कमलसिंग क्षत्रिय यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समान संधी केंद्र समन्वयक सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ.संध्या पौडमल यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते.