वनअधिकाऱ्यांसमवेतची बैठक यशस्वी; समाजाच्या मागण्यांवर अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
महाबळेश्वर -सोनाट (ता. महाबळेश्वर) – १०५ गाव समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेली बहुचर्चित बैठक हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देणे, तसेच वनविभागाच्या जाचक अटी रद्द कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस उपवनसंरक्षक अधिकारी श्री. अमोल सातपुते आणि मोहिते साहेब हे प्रमुख उपस्थित होते. समाजाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले, तसेच त्यातील सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. अनेक समाजबांधवांनी आक्रमक पद्धतीने आपले प्रश्न मांडले आणि अनेक वर्षांपासून खदखदत असलेले विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
वनअधिकाऱ्यांनी निवेदनातील बहुतेक सर्व मुद्द्यांवर सकारात्मक आणि आश्वासक प्रतिसाद दिला. उपस्थित समाजबांधवांनी या निकालावर समाधान व्यक्त केले आणि “१०५ गाव समाज एकजुटीचा विजय झाला” असे उद्गार काढले.
*🔹 बैठकीतील प्रमुख निर्णय व मुद्दे*
*1️⃣ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत:*
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व जखमी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यात आली असून, उर्वरित रक्कम लवकरच वितरित करण्यात येईल.
*2️⃣ पीक नुकसान भरपाई:*
शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत देण्यात येईल.
*3️⃣ रस्ते, वीज, केबल सुविधा कायम:*
फॉरेस्ट मधून जाणाऱ्या रस्ते, शेतमार्ग, वीजखांब, इंटरनेट केबल आदी कामांमध्ये अडथळा आणला जाणार नाही.
*4️⃣ शेती कुंपण योजना:*
शेतीचे संरक्षण करण्यासाठी उपलब्ध योजनांची माहिती देण्यात येईल आणि आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.
*5️⃣ वनव्यवस्थापन समिती स्थापन:*
स्थानिक स्तरावर वन व्यवस्थापन समिती स्थापन करून तिच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
*6️⃣ फायरगन परवानगी:*
शेतीचे संरक्षण करण्यासाठी फायरगन (प्राणी हत्या न करता) वापरण्यास परवानगी दिली जाईल.
*7️⃣ हद्द निश्चिती व प्रलंबित खटले:*
वनविभागाची हद्द स्पष्ट करून प्रलंबित खटले निकाली काढले जातील.
*8️⃣ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी:*
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल.
*9️⃣ खाजगी जमिनींचे संरक्षण:*
“वनसदृश्य” या नावाखाली खाजगी जमिनी वनविभाग घेत नाही, याची खात्री दिली जाईल.
*🔟 झाडतोडीवरील सवलत:*
घर बांधकाम वा इतर कामांसाठी मालकीच्या जमिनीवरील झाडे तोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.
*11️⃣ समन्वयक बैठक:*
वनविभाग व १०५ गाव सामाजिक संघटना यांच्या दरम्यान सहामाही अथवा वार्षिक समन्वयक बैठक घेण्यात येईल, जेणेकरून प्रश्न तत्काळ सोडवले जातील.
बैठकीचे उत्कृष्ट संचालन संजय संकपाळ गुरुजी यांनी केले. समाजाच्या वतीने संजय गायकवाड, गणेश उतेकर, संतोष कदम, सुभाष सोंडकर, प्रकाश गुरुजी, संजय देसाई, समीर चव्हाण, डी.के. जाधव, धनश्याम सकपाळ, धोंडीबा महाराज, कोंडीबा महाराज,माजी सरपंच गणेश जाधव, हरिभाऊ सकपाळ, धोंडीबा धनावडे, चंदू गुरुजी, भाऊ मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले व मार्गदर्शन केले.
अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व प्रश्नांना उत्तर देत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीतून १०५ गाव समाजाची संघटित शक्ती, एकजुटीचा आवाज आणि प्रशासनाशी संवादाची रचनात्मक दिशा स्पष्ट झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी ही बैठक ऐतिहासिक ठरली, असा सूर समाजबांधवांतून व्यक्त करण्यात आला.“१०५ गाव समाज संघटनेचा हा विजय म्हणजे जनतेच्या एकतेचा विजय आहे,” असे मत अनेक उपस्थितांनी व्यक्त केले.




