सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चाललेले ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे हे चारित्र्यहनन आम्ही कदापी खपवून घेणार नाही- सुहास राजेशीर्के
तर मानहानीच्या दावा ठोकणार तर राज्यभर टाळेटोख आंदोलन होईल निर्माते, दिग्दर्शक आणि थिएटर चालकांना इशारा
सातारा प्रतिनिधी :छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई साहेब या इतिहासातील सर्व व्यक्तिरेखा म्हणजे महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आहे. उभ्या भारताची अस्मिता आहे. मात्र मालिका चित्रपट यामध्ये या व्यक्तिरेखांच सादरीकरण मनोरंजक पद्धतीने केले जातंय. फक्त टीआरपी वाढवणे या उद्देशाने इतिहासाची अत्यंत घृणास्पद मोडतोड चालवलीय. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चाललेले ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे हे चारित्र्यहनन आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा देत छावा चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. जर तसे झालेच तर राज्यभर टाळेटोख आंदोलन छेडून थिएटर बंद पाडू असा आंदोलनात्मक पवित्रा महाराणी येसूबाई फौडेशनचे सर्वेसर्वा सुहास राजेशिर्के यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेद्वारे व्यक्त केला.
सुहास राजेशिर्के पुढे म्हणाले, नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट पेऊ घातला आहे. याचा टिझर नुकताच प्रसिद्ध झाला. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अत्यंत उथळपणे मांडलेली दिसत आहे . त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी महाराणी येसूबाई साहेब यांची व्यक्तिरेखा देखील वास्तवाला धरून नाही. या टिझर मध्ये काही गाण्याचा भाग दाखवला आहे. ज्यात दस्तरखुद्द छत्रपती संभाजी महाराज जिरे टोप घालून आपल्या पट्टराणी समवेत लेझीम या पारंपारिक महाराष्ट्राची बाज असणाऱ्या खेळातून नाचताना दाखवलेले आहेत. वास्तविक पाहता लेझीम हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक खेळ नसून कधीकाळी तो एक व्यायाम प्रकार म्हणून प्रसिद्ध होता. कदाचित चित्रपटाचे दिग्दर्शकांचा याबाबत अभ्यास नसावा.
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या प्रतिकूल परिस्थितीत झाला त्या परिस्थितीचा अभ्यास दिग्दर्शकांनी करायला हवा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर सत्तेसाठी चाललेले महाभारत, स्वकियांनी आणि परकियांनी टाकलेले डाव छत्रपती संभाजी महाराजांनी उधळून लावले. अत्यंत कठोर निर्णय घेत स्वतः विरुद्ध चाललेला कट हाणून पाडत आपला राज्याभिषेक करून घेतला. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला तर छत्रपती संभाजी महाराजांचे लेझीम डान्स तसेच फिल्मी हिरो स्टाईलने जॅकेट झटकण्याची लकब या गोष्टी कधीही वास्तवाला धरून दिसत नाहीत. राज्याभिषेकानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत असंख्य संकटांना संभाजीराजांना तोंड द्यावे लागले. कधीच स्वकीयांचा तर कधी परकीयांचा बिमोड करावा लागला. त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले. या सगळ्या धामधुमीत त्यांना असले नाचकाम करायसाठी सवड तरी मिळाले असेल का? हा प्रश्न उद्भवतो.
दुसरा मुद्दा आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई साहेबांचा. येसूबाई साहेब या तर स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून नेमणुकीत होत्या. त्यांनी संभाजी महाराजांना अत्यंत धीरगंभीरपणे साथ दिली. संकटसमयी, अनेक बिकट प्रसंगात त्यांना सावरले. तत्कालीन मराठा समाजात सर्वसामान्य स्त्री-पुरुषांचे एकत्र नाचकाम कधी होत असेल अशी आपली परंपरा नाही. मग या तर स्वतः कुलमुखत्यार. तसेच छत्रपतीच्या पट्टराणी होत्या. त्यामुळे या चित्रपटामध्ये दाखवलेला असला खुळचट प्रकार घडला असेल यावर महाराष्ट्रातील जनता कधीच विश्वास ठेवणार नाही, येसूबाई साहेबांचे स्वराज्यासाठी असलेले योगदान, त्यांनी केलेला त्याग या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्यांची व्यक्तिरेखा या चित्रपटात अधिक प्रभावीपणे मांडता आली असती. परंतु चित्रपट निर्मात्याने दिग्दर्शकाने फक्त आणि फक्त मनोरंजन एवढाच विचार करून या चित्रपटाची मांडणी केलेली दिसते, असेही शेवटी सुहास राजेशिर्क यांनी स्पष्ट केले.
