आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा; व्याघ्र संवर्धनासाठी पंचसूत्री आराखडा
व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राची बुलंद झेप, आधुनिक तंत्रज्ञानाने मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यावर भर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2026’ निमित्त आयोजित कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अन्नसाखळीत वाघांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून व्याघ्र संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्याघ्र संवर्धनाचे कार्य सुरू असून ते अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
वन विभागाच्या पुढाकाराने व्याघ्र प्रकल्प परिसरातील नागरिक पुनर्वसनाच्या कामात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये नियोजनबद्ध उपाययोजना केल्या जात आहेत. वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅकिंगसह विविध आधुनिक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच, एआय आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टिमचाही प्रभावी वापर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, व्याघ्र प्रकल्प ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून, व्याघ्र संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे योगदान देण्याची गरज आहे. देशातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या वाढली आहे. तसेच कोअर क्षेत्रही वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची संकल्पना मांडल्यानंतर वाघांची संख्या वाढवण्याचे निर्धारित ध्येय फक्त भारत व नेपाळ या दोनच देशांनी साध्य केले आहे. जगातील एकूण वाघांपैकी सुमारे 75% वाघ भारतात आहेत. व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्रानेही उल्लेखनीय कामगिरी केली असून, राज्यातील वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे.
मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, व्याघ्र अधिवास हरित उपजिविका अभियान राबविणे, व्याघ्र संवर्धनासाठी सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर धोरण आखणे, शाश्वत पर्यटन धोरण तयार करून रोजगार निर्मिती करणे आणि पर्यटन वाढवतांना वनसंरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे अशी व्याघ्र संवर्धनासाठी पंचसुत्री आखण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सुमित वानखेडे, भूतान, कंबोडिया आणि बांगलादेश येथील प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.





