Home » राज्य » शिक्षण » छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अभ्यासू, उत्साही व कलाप्रेमी प्राध्यापिका: प्रो.डॉ.रोशनआरा शेख

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अभ्यासू, उत्साही व कलाप्रेमी प्राध्यापिका: प्रो.डॉ.रोशनआरा शेख

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अभ्यासू, उत्साही व कलाप्रेमी प्राध्यापिका: प्रो.डॉ. रोशनआरा शेख                                                                               

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील उपप्राचार्या, ज्यांनी इंग्रजी विभागात विभाग प्रमुख म्हणून अतिशय उल्लेखनीय असे काम केले, तसेच आपल्यातील वैयक्तिक कलागुणांनी ज्यांनी विद्यार्थ्यांना संघटीत करून बहुविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणले, योग्य मार्गदर्शन करीत ज्यांनी युवा महोत्सवात कॉलेजला अनेक पारितोषिके मिळवून दिली, आणि त्यांच्याच कार्यकाळात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विद्यार्थ्यांनी खेचून आणले, अशा प्रेरणादायी, विद्यार्थीप्रिय उत्साही प्राध्यापिका, उपप्राचार्या प्रा.डॉ.रोशनआरा शेख या शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने सिंहावलोकन करून आपण त्यांच्या सेवा वाटचालीचा प्रवास समजून घेणे आवश्यक आहे. 

        प्रा.डॉ.रोशनआरा शेख यांचा जन्म २५ जानेवारी रोजी झाला. श्रीगोंदा येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक असलेल्या बाबूमिया बँडवाले यांच्या त्या नात होत. आजोबा सत्यशोधक असल्याने लहानपणापासूनच पुरोगामी व सत्यशोधक विचारांचे अत्यंत चांगले संस्कार त्यांना मिळाले. शुद्ध वर्तन, आजोबा व वडील हे कलाकार तसेच संगीत विशारद असल्यामुळे संगीताचा वारसाही त्यांना लहानपणी मिळाला. आजी मुख्याध्यापिका होत्या. त्यामुळे शाळेत देखील हुशारी आली. क्षमता संपादन केल्यामुळे त्यांना इयत्ता २ री मधून ४ थीच्या वर्गात बसविण्यात आले. हायस्कूलचे शिक्षणात देखील नेहमी पुढे. १२ वी विज्ञान झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर कॉलेज ,अहमदनगर या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ५ वर्षे वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. बी.ए .व एम.ए इंग्रजी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत त्यांनी यश संपादन केले. त्यांच्या आई राबिया सय्यद यांची इच्छा होती की, त्यांनी प्राध्यापक व्हावे. त्याना घडवण्याचे संपूर्ण श्रेय त्या आपल्या आईला देतात. १९८६ साली वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्या प्राध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या शिरवळ येतील विनाअनुदानित कला व वाणिज्य महाविद्यालयात रुजू झाल्या. दरम्यान पीएच.डी पदवी पुणे विद्यापीठातून संपादन केली. १९९४ ला डी.पी.भोसले कॉलेज कोरेगाव येथे त्यांची बदली झाली. तिथेही गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केले. २०१० मध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या महाविद्यालयात देखील इंग्रजी विभाग प्रमुख व IQAC कॉर्डीनेटर म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या.

           जून २०१८ पासून त्यांची बदली रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज या ठिकाणी झाली. पहिल्याच वर्षी स्टाफ अॅकॅडमी विभाग प्रमुख म्हणून काम करून वर्षभरात १६ व्याख्यानाचे आयोजन केले. तसेच याच वर्षी पासून सांस्कृतिक विभाग प्रमुख ही जबाबदारी तर घेतलीच शिवाय नॅक क्रायटेरिया क्रमांक २ ची महत्वाची जबाबदारी ३ वर्षे हे पार पाडली. तसेच २०२० पासून त्यांनी उपप्राचार्य म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. या सांस्कृतिक विभाग प्रमुख झाल्यानंतर, शिवाजी विद्यापीठाच्या सातारा जिल्हा स्तरीय युवा महोत्सवाचे यजमानपद छत्रपती शिवाजी कॉलेजने घेतले. त्याच्या त्या समन्वयक होत्या. या युवा महोत्सवात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पारितोषिके छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवली. एवढेच नव्हे तर पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धा झाली त्यातही छत्रपती शिवाजी कोलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. कामाचे उत्तम नियोजन, नीटनेटकेपणा व तळमळीने काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले. इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी ५ वर्षे उल्लेखनीय काम केले. तसेच विद्यार्थ्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी आपल्या विभागात केले. इंग्रजी विषयातील अनेक विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलसमधून त्यांचे 30 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशीत झाले आहेत. याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली यांच्या अनुदानातून एक संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. या काळात विभागात रिफ्रेशर कोर्स घेण्याचा निर्णय आणि आयोजन, दोन अंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन त्यांनी केले.  

मराठी, हिन्दी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असून या तीन्ही भाषेत या उत्तम निवेदन करतात. तसेच सामाजीक कामातही त्यांचा सहभाग आहे. ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर अनेक ठिकाणी त्या मार्गदर्शन करतात. ‘दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘बचत गट काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आमंत्रीत करण्यात आले होते. 

त्यांनी आत्तापर्यंत ४ राज्यस्तरीय व ३ राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत. ‘ज्ञान दायिनी गौरव सन्मान’, ‘राष्ट्रीय शिक्षक भूषण पुरस्कार’, आदिशक्ती साताऱ्याची महिला सन्मान’, ‘कॉमनवेल्थ एक्सलंस अवार्ड’ ,‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार’, राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवारत्न सन्मान’, ‘उत्तम निवेदिका पुरस्कार’ इत्यादी पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत. त्यांचे पती सुजित शेख व चिरंजीव रोहीत शेख हेही पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांच्या सर्व कामात त्यांचाही सपोर्ट आहे. 

      कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या त्या नियामक मंडळ सदस्य, इंग्लिश अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष, इंग्लिश संशोधन सल्लागार समिती प्रमुख, विद्यार्थी विकास मंडळ सदस्य, विविध महाविद्यालयाच्या विद्यापरिषद सदस्य व छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थिनी वसतीगृहाच्या प्रमुख व विद्यापीठाच्या पीएच.डी. पदवी साठी इंग्रजी विषयाच्या त्या मार्गदर्शक इत्यादी जबाबदार पदावर त्यांनी काम केले. 

डॉ. शेख मॅडम यांची एकूण ३९ वर्ष २ महीने प्राध्यापक म्हणुन रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमधून सेवा केली. आज या प्रदीर्घ सेवेतून त्या निवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या सर्व स्टाफकडून व विद्यार्थ्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket