छत्रपती शिवाजी कॉलेजच्या उप प्राचार्यपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती
सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य पदावर मराठी विभाग प्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ,सुभाष वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली.
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झालेल्या प्राध्यापकांच्या बैठकीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता व उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे,विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.आर.आर.साळुंखे, स्टाफ वेल्फेअर विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी पाटील,उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख,प्रा.डॉ.सविता मेनकुदळे,डॉ.संदीप किर्दत,डॉ.राज चव्हाण व विविध विभागाचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. उपप्राचार्य झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव बी.एन.पवार,प्रा.प्रदीप हिवरकर,सुर्यकांत पोरे,सुनील देसाई,राजेंद्र वाघ,प्रदीप कुंभार, श्रीमती श्रावणी बर्गे,प्रा.डॉ.व्हनबट्टे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.
प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे यांचे मूळगाव सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यातील मळोली हे असून छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहात त्यांनी १९८३ ते १९९० या काळात ११,१२ वी सह बी.ए व एम.ए.पदवीसाठी मराठी विषयात त्यांनी शिक्षण घेतले. १९९० ला एम.ए.मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवून त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला.रायगड जिल्ह्यात पनवेल ,फुंडे,नगर जिल्ह्यात कर्जत, सोलापूर जिल्ह्यात माढा ,मंचर, सातारा जिल्ह्यात लोणंद,पाचवड,येथे त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.याच काळात त्यांनी नेट,सेट,पात्रता परीक्षेत यश मिळवले.तसेच मराठी विषयात पीएच.डी पदवी मिळविली. उपक्रमशीलता,विद्यार्थ्यांना हितकारी मार्गदर्शन,संवादकौशल्य,विवेकी विचाराचे प्रसारण,संपादन,साहित्यलेखन,गायन,वक्तृत्व, इत्यादी अनेकविध वैशिष्ट्य असलेले प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी विद्यार्थी व समाजाशी सुसंवादी सर्जनशील प्रयोगशील असे व्यक्तिमत्व आहे. मराठी विषयाच्या शिक्षक संघटनेत काम केले आहे. अलीकडेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी भेट देणाऱ्या टीममध्ये सहभागी होऊन युके मधील,इंग्लंड देशामधील लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिकस,तसेच ग्रेज इन या संस्थाना भेट दिली.‘संविधानाच्या स्वप्नातले गाव’ व ‘मी भारतीय’हे कवितासंग्रह लिहून महाराष्टातील अनेक पुरस्कार त्यांनी मिळविले. प्रेरणाशक्ती माता हा ग्रंथ संपादित करून त्यांनी अनेकांना लिहिते केले.त्यांचे गुरु प्रा.बी.डी.पाटील यांचे विषयी गौरव ग्रंथ संपादित केला. बेघर भूमिहीन झोपडपट्टीतून जगण्याची सुरुवात करून आजवर ३५ वर्षे विविध महाविद्यालयात नोकरी करत त्यांनी आपली गुणवत्ता तर वाढवलीच पण अनेक जणांना शिक्षण घेण्यासाठी,निर्व्यसनी राहण्यासाठी प्रेरित केले. गावी समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्था मळोली ही संस्था स्थापन करून सामाजिक बांधिलकी जोपासली. मराठी विभाग प्रमुख,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा येथे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक म्हणून आजही ते उत्साहाने काम करीत आहेत. समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य ,मळोली गावचे हितचिंतक ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी तसेच अन्य विभागातील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले .
