छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये लेखक सुधीर शेरे यांचा मराठी भाषा विद्यार्थ्यांशी संवाद
वेस ,एक होती गंगा व ओव्या दिनाच्या पुस्तके ग्रंथालयास भेट
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मूळ चवणेश्वर हे गाव असलेले लेखक सुधीर शेरे यांनी आज मराठी विभागास भेट दिली. मराठी विभागाने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात मराठी विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य मा.प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी त्यांचा बोलीगंध प्रातिनिधिक कवितासंग्रह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर सदन मध्ये संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. या प्रसंगी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे विद्यार्थ्याना म्हणाले की’ आता केवळ प्राध्यापकाने व्याख्यान द्यायचे आणि विद्यार्थ्याने ऐकायचे ,अशा प्रकारचे अध्यापन उपयुक्त ठरणार नाही. म्हणूनच प्रत्यक्ष प्रयोग करणे ,आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असेल. त्यामुळेच आम्ही लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आवर्जून आयोजन करीत आहोत. लेखक कसा तयार होतो, लेखकाचा जगण्यासाठी कोणता दृष्टीकोन आहे,त्याचे साहित्य आणि जीवन यांचा सबंध काय असतो समजून घ्यायला हवे. केवळ परीक्षेतले गुण महत्वाचे नसून माणूस माणूस समजून घेण्याचे सामर्थ्य वाढत असते,त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः कार्यक्रमात व उपक्रमात संवाद साधला पाहिजे. असे सांगत त्यांनी सुधीर शेरे यांच्या एक होती गंगा हा कथासंग्रहातील एक होती गंगा या कथेच्या अनुषंगाने ही कथा कशी तयार झाली याबद्दलचा अनुभव व्यक्त करण्यास सांगितले. यावेळी विभागातील प्राध्यापक डॉ.विद्या नावडकर, प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे,प्रा.प्रियांका कुंभार ,प्रा. श्रीकांत भोकरे, प्रथमेश बाबर यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुधीर शेरे म्हणाले ‘ एक होती गंगा ..ही नागझरी येथील एका आश्रमात भेटलेली मुलगी होती. माझी मुलगी याच आश्रमात शिकत होती. एकदा तिला भेटायला गेल्यावर मला गंगा भेटली होती. तिचे बोलणेही झाले होते..पण पुढे आठ दिवसात हे जग सोडून गेली. ही गोष्ट कळताच मी अतिशय दुःखी झालो. त्यामुळे माझ्या ह्रदयात भावना जाग्या झाल्या..तिच्या बद्दल लिहिण्याचे ठरवले. त्यासाठी तिची सर्व माहिती पुन्हा मिळविली. आणि शक्य तितके सत्य काही ठिकाणी कल्पना याचा संयोग घडवून एक होती गंगा ही कथा तयार झाली. अनाथ जीवन माणसाच्या मनाला कसे आतून व्याकूळ करते हे मी माझ्या मनात अनुभवले. मानवी जीवन सुखापेक्षा दुःखानी भरले आहे, आपण हे दुःख शोधले पाहिजे. साहित्यिक संवेदनशील असतात. ते मनाला लावून घेतात. म्हणून विचारी असणे ,शोधक असणे,कल्पना सुचणे ,अनुभव घेणे हे लेखक होण्यास उपयुक्त ठरते. साहित्य वाचनाने मन उदात्त होते. अनेकांचे दुःख पाहिले की जीवनातले सत्य समजायला लागते..अहंकार विरून जातात. म्हणून माणसे वाचावीत. ग्रंथ रोज वाचावेत. प्रामाणिकपणे केलेला अभ्यास , आवड, अखंड परिश्रम चांगला माणुस घडायला मदत करतात. एकदा चांगलं मनुष्यत्व प्राप्त करु शकलोत की साधेपनाने आनंदी ,समाधानी , जीवन जगता येते. समस्या निवारण संयमाने करता येते. गरजा कमी असल्या की ओढाताण न होता आयुष्याचा आनंद समाधानाने घेता येतो. संवेदनशीलता अंगी असेल तर लेखनादी कार्यात समाधानपूर्वक यश मिळतं. म्हणून चांगले विद्यार्थी, चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करा. तेच खरे शिक्षण आहे. असे ते म्हणाले. संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी जाणीवेने निरीक्षण करणे आवश्यक आहे हे मत योग्य असल्याचे सांगितले. अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नसून जीवन घडविण्यासाठी सतत क्रियाशील असणे ,शोधक दृष्टीचा विकास करणे ,नवे अनुभव आवर्जून घेणे ,घेतलेल्या अनुभवाचे विश्लेषण करणे हे आम्हाला चांगले कळले अशी प्रतिक्रिया दिली.
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे
प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख,
पदवी व पदव्युत्तर मराठी अभ्यास व संशोधन केंद्र,
प्रसिद्धी विभागप्रमुख
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा.
(घटक महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा)
भ्रमणध्वनी: ९८९०७२६४४०




